रस्त्यांवर पडलेले खड्डे ही तर जागतिक समस्या; एकाने तक्रार करताच, सर्वांनीच मांडल्या व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 08:32 AM2021-07-19T08:32:15+5:302021-07-19T08:33:43+5:30

भारतासह अनेक देशांतील लोकांनीही आपल्या येथील रस्त्यांवरच्या खड्ड्यांची माहिती देत व्यथा मांडायला सुरुवात केली.

potholes are a global problem everyone expressed grief | रस्त्यांवर पडलेले खड्डे ही तर जागतिक समस्या; एकाने तक्रार करताच, सर्वांनीच मांडल्या व्यथा

रस्त्यांवर पडलेले खड्डे ही तर जागतिक समस्या; एकाने तक्रार करताच, सर्वांनीच मांडल्या व्यथा

Next

लंडन : ब्रिटनच्या रस्त्यांवर खड्डे पडले असून, खूप हाल सोसावे लागतात, असे तक्रारवजा ट्वीट तेथील नागरिकाने केले. त्यापाठोपाठ भारतासह अनेक देशांतील लोकांनीही आपल्या येथील रस्त्यांवरच्या खड्ड्यांची माहिती देत व्यथा मांडायला सुरुवात केली. त्यातून सर्वच देशांत ही समस्या लोकांना त्रासदायक ठरत असल्याचे चित्र समोर आले.

खड्डे पडलेले रस्ते फक्त ब्रिटनमध्येच दिसतात. असे एक वाक्य नो कन्टेक्स्ट ब्रिट्स या ट्विटर अकाऊंटवर झळकलेल्या खड्ड्यांच्या छायाचित्राखाली लिहिण्यात आले. कोणत्याही गोष्टीत डोकावणारा विनोद शोधून त्याचे दर्शन घडविणारी ट्विट नो कन्टेक्स्ट ब्रिट्स या ट्विटर खात्यावर लिहिली जातात. या ट्विटला ७८ हजार लोकांनी लाईक केले असून, सुमारे २० हजार लोकांनी रिट्विट केले आहे. 

ब्रिटनमधील खड्डे पडलेल्या रस्त्यांचे छायाचित्र पाहून इतर देशांतील नागरिकांनीही त्यांच्या येथील खराब रस्त्यांची छायाचित्रे या ट्विटखाली झळकविली. त्यामध्ये भारत, अर्जेंटिना, पाकिस्तान, रशिया, नायजेरिया येथील नागरिकांचा समावेश होता. 

इतर देश रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचा तरी प्रयत्न करतात. भारतात मात्र खड्डे तसेच ठेवतात, अशी व्यथा दिल्लन या व्यक्तीने खड्ड्यांच्या छायाचित्रांसह मांडली आहे. अर्जेंटिनाच्या वड्रा सॅबेस्टियन नावाच्या व्यक्तीने ट्विटमध्ये लिहिले की, आमच्या देशात आम्ही रस्त्यांवरील खड्ड्यांचे वाढदिवस साजरे करतो. कारण अनेक वर्ष हे खड्डे कायम असतात. पाकिस्तानमधील कराची येथील पत्रकार फैजान लखानी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये खड्ड्यांची छायाचित्रे दिली आहे. या खड्ड्यांच्या जागेलाच कराची म्हणतात, अशी उपरोधिक टिप्पणीही त्यांनी केली.

दक्षिण आफ्रिका, अमेरिका, कझाकिस्तान, सौदी अरेबियातही दुरवस्था

रशियातील एका नागरिकाने तेथील खड्ड्यांच्या छायाचित्राचे रशियाच्या रस्त्यांवरील हास्य असे वर्णन केले आहे.

नायजेरियातील राष्ट्रीय महामार्गांची स्थिती खड्ड्यांमुळे खूपच भीषण बनली आहे, असे तक्रारवजा ट्विट तेथील एका नागरिकाने केले आहे.

रस्त्यांतील खड्डयांची माहिती देणारी ट्विट दक्षिण आफ्रिका, अमेरिका, थायलंड, कुवेत, कझाकिस्तान, सौदी अरेबिया आदी देशांतील नागरिकांनीही केली आहेत.

रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या जागतिक स्वरूपाची आहे याचेच दर्शन या ट्विटमधून झाले आहे. सोशल मीडियात याचे प्रतिबिंब दिसते.

Web Title: potholes are a global problem everyone expressed grief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.