अमेरिकेच्या सर्वात मोठ्या रिफायनरीमध्ये महाभयंकर स्फोट! टेक्सासमधील वलेरो इंधन केंद्रात आग, धुराचे लोट; शहरात आणीबाणीचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 09:48 IST2026-03-24T09:47:52+5:302026-03-24T09:48:55+5:30
Valero Refinery Explosion Texas Marathi : टेक्सासमधील वलेरो एनर्जी रिफायनरीमध्ये भीषण स्फोट. ३.८० लाख बॅरल क्षमतेच्या केंद्रात आग लागल्याने इंधन संकट गडद. पोर्ट आर्थरमध्ये आणीबाणी जाहीर. वाचा सविस्तर बातमी.

अमेरिकेच्या सर्वात मोठ्या रिफायनरीमध्ये महाभयंकर स्फोट! टेक्सासमधील वलेरो इंधन केंद्रात आग, धुराचे लोट; शहरात आणीबाणीचा इशारा
अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील पोर्ट आर्थर येथील 'वलेरो एनर्जी' या प्रचंड मोठ्या तेल रिफायनरीमध्ये सोमवारी रात्री उशिरा एक भीषण स्फोट झाला. रिफायनरीतील एका इंडस्ट्रियल हीटरमध्ये हा धमाका झाला असून, त्यानंतर संपूर्ण परिसरात आगीचा भडका उडाला आहे. या घटनेमुळे आकाशात काळपट धुराचे प्रचंड लोट पाहायला मिळत असून परिसरातील शहरांना मोठा धक्का बसला आहे.
स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ६:३० च्या सुमारास हा स्फोट झाला. हा इतका शक्तिशाली होता की त्याचे हादरे शेजारील ग्रोव्ह्स आणि नेदरलँड या शहरांमध्येही जाणवले. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने पोर्ट आर्थरमधील पश्चिम भागातील नागरिकांसाठी 'शेल्टर-इन-प्लेस' (घरातच राहण्याचे) आदेश जारी केले आहेत. नागरिकांना खिडक्या आणि दरवाजे पूर्णपणे बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत, जेणेकरून विषारी वायूचा त्रास होणार नाही.
इंधन पुरवठ्यावर संकटाची टांगती तलवार
ही रिफायनरी दररोज सुमारे ३,८०,००० बॅरल तेल प्रक्रिया करण्याची अवाढव्य क्षमता राखते. अमेरिकेच्या 'गल्फ कोस्ट' रिफायनिंग नेटवर्कचा हा अत्यंत महत्त्वाचा भाग असल्याने, येथील कामकाज ठप्प झाल्यास अमेरिकेतील इंधन पुरवठ्यावर आणि किमतींवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जीवितहानीबाबत अपडेट
सुदैवाने, प्रशासनाकडून अद्याप कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा कोणी जखमी झाल्याची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.