Pope Francis: पोप फ्रान्सिस यांचं निधन, दीर्घ आजारपणानंतर व्हॅटिकन सिटी येथे घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 14:16 IST2025-04-21T13:54:00+5:302025-04-21T14:16:53+5:30
Pope Francis Passes Away: गेल्या काही काळापासून आजारपणाशी झुंजत असलेले ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं आज निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. प्रकृतीच्या समस्यांचा सामना करत असलेल्या पोप फ्रान्सिस यांनी आज व्हॅटिकस सिटी येथे अखेरचा श्वास घेतला.

Pope Francis: पोप फ्रान्सिस यांचं निधन, दीर्घ आजारपणानंतर व्हॅटिकन सिटी येथे घेतला अखेरचा श्वास
गेल्या काही काळापासून आजारपणाशी झुंजत असलेले ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं आज निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. प्रकृतीच्या समस्यांचा सामना करत असलेल्या पोप फ्रान्सिस यांनी आज व्हॅटिकस सिटी येथे अखेरचा श्वास घेतला. व्हॉटिकनमधील प्रशासनाने त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
पोप फ्रान्सिस यांच्या निधनाची घोषणा करताना व्हॅटिकनने सांगितले की, रोमन कॅथॉलिक चर्चचे पहिले दक्षिण अमेरिकन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन झालं. त्यांच्या दोन्ही फुफ्फुसामध्ये न्यूमोनियाचा संसर्ग झाला होता. तसेच ते बऱ्याच दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होते. हल्लीच त्यांना रुग्णालयामधून डिस्चार्ज देण्यात आला होता.
Pope Francis died on Easter Monday, April 21, 2025, at the age of 88 at his residence in the Vatican's Casa Santa Marta: Vatican News pic.twitter.com/Rmn88TQbhw
— ANI (@ANI) April 21, 2025
पोप फ्रान्सिस यांचा जन्म अर्जेंटिनामध्ये झाला होता. त्यांचं जन्मावेळचं नाव जॉर्ज मारियो बेर्गोलियो असं होतं. २०१३ मध्ये बेनेडिक्ट सोळावे यांनी पोपपदाचा राजीनामा दिल्यानंतर फ्रान्सिस यांची पोप म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. कुठल्याही बिगर युरोपियन व्यक्तीची पोप म्हणून निवड होण्याची ही पहिलीच वेळ होती.
आजारपणाचा सामना करत असलेल्या पोप फ्रान्सिस यांनी रविवारी ईस्टरनिमित्त सेंट पीटर स्क्वायर येथे उपस्थित असलेल्या हजारो ख्रिस्ती अनुयायांना दर्शन देत त्यांच्या अभिवादनाचा स्वीकार केला होता. पोप फ्रान्सिस यांचं संपूर्ण जीवन हे ईश्वरसेवेमध्ये समर्पित राहिले होते, अशा शब्दात व्हेटिकन सिटीचे कार्डिनल केविन फेरेल यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.