धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन; भारतात २२ ते २४ एप्रिल असा ३ दिवस राष्ट्रीय दुखवटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 05:41 IST2025-04-22T05:40:35+5:302025-04-22T05:41:09+5:30
जगासाठी दिला हाेता शेवटचा शांततेचा संदेश, धार्मिक, वैचारिक, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, दुसऱ्यांच्या विचारांचा सन्मान केल्याशिवाय शांतता प्रस्थापित होणे केवळ अशक्य...

धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन; भारतात २२ ते २४ एप्रिल असा ३ दिवस राष्ट्रीय दुखवटा
व्हॅटिकन सिटी - रविवारी (२० एप्रिल) जगभरातील कॅथॉलिक आणि कट्टरपंथीय एकत्र ईस्टर साजरा करीत असताना ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी आपला शेवटचा संदेश दिला.
युद्धग्रस्त युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी दिलेल्या या संदेशात ते म्हणाले होते, ‘धार्मिक स्वातंत्र्य, वैचारिक स्वातंत्र्य, अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आणि दुसऱ्यांच्या विचारांचा सन्मान केल्याशिवाय शांतता प्रस्थापित होणे शक्य नाही. खऱ्या अर्थाने शस्त्रे नष्ट केल्याशिवाय देखील शांतता प्रस्थापित होणार नाही. प्रत्येकाला आपल्या संरक्षण करण्याचा अधिकार आहे.’ पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८८ वर्षे होते. भारतात २२ ते २४ एप्रिल असा ३ दिवस राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येईल.
३८ दिवस सुरू हाेते उपचार
पोप फ्रान्सिस यांच्या निधनाची माहिती व्हॅटिकनचे कॅमेरलेन्गो कार्डिनल केविन फैरेल यांनी डोमुस सांता मार्ता येथे दिली. या ठिकाणी पोप फ्रान्सिस राहात होते. फ्रान्सिस यांना डबल न्यूमोनिया झाला होता. पोप फ्रान्सिस यांच्या मृत्यूनंतर सेंट पीटर्समध्ये त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन, त्यांच्यावर अंत्यसंस्कार, नवीन पोपची निवड या गोष्टी पार पडणार आहे.
पोप फ्रान्सिस हे करुणा, नम्रता यांचे प्रतीक म्हणून कोट्यवधी लोकांच्या सदैव स्मरणात राहतील. येशू ख्रिस्तांनी सांगितलेल्या विचारांचा प्रसार करण्याचे व्रत त्यांनी स्वीकारले होते. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान