PM मोदींचा अमेरिका दौरा ठरला; चर्चेनंतर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 08:49 IST2025-01-28T08:46:22+5:302025-01-28T08:49:45+5:30
PM Modi Donald Trump: अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवरून चर्चा झाली. या चर्चेनंतर ट्रम्प यांनी मोदींच्या अमेरिका दौऱ्याची माहिती दिली.

PM मोदींचा अमेरिका दौरा ठरला; चर्चेनंतर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच केली घोषणा
PM Modi President Trump News: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवरून चर्चा झाली. अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर आठवडाभराने दोन्ही नेत्यांमध्ये बोलणी झाली. पंतप्रधान मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांचं दुसऱ्यांदा अध्यक्ष झाल्याबद्दल अभिनंदन केलं. यावेळी इमिग्रेशनच्या मुद्द्यावरही बोलणी झाली. या चर्चेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर येत असल्याचे जाहीर केले. (PM Modi held a telephonic conversation with Donald Trump)
वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवरून चर्चा झाली. या चर्चेनंतर पंतप्रधान मोदी फेब्रुवारीमध्ये अमेरिकेच्या दौऱ्यावर येणार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. व्हाईट हाऊसने यासंदर्भातील माहिती दिली.
मोदी-ट्रम्प यांच्यात काय झाली चर्चा?
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, 'पीएम मोदींसोबत इमिग्रेशनच्या मुद्द्यावर महत्त्वाची चर्चा झाली. दोन्ही देशांतील व्यापार आणि भारत-अमेरिका यांच्यातील संबंध अधिक वृद्धिंगत करण्यावर चर्चेत भर देण्यात आला.'
व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, आज (२८ जानेवारी) अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोनवरून अर्थपूर्ण चर्चा झाली. दोन्ही देशातील संबंध विस्तारण्याबरोबरच अधिक घट्ट करण्यावर दोन्ही नेत्यांनी जोर दिला. इंडो-पॅसिफिक सुरक्षा, मध्य पूर्व आणि युरोप यासह स्थानिक मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांची चर्चा केली.
माझे मित्र ट्रम्प यांच्याशी बोलून आनंद झाला -मोदी
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून झालेल्या संवादानंतर पंतप्रधान मोदींनी ट्विट करून याची माहिती दिली.
"माझे प्रिय मित्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोलून आनंद झाला. ऐतिहासिक दुसऱ्या कार्यकाळासाठी त्यांचे अभिनंदन केले. आम्ही विश्वासार्ह भागीदारी आणि एकमेकांच्या फायद्यासाठी कटिबद्ध आहोत. आम्ही आमच्या लोकांच्या कल्याणासाठी, जागतिक शांतता, समृद्धी आणि सुरक्षिततेसाठी एकत्र काम करू", असा विश्वास मोदी यांनी ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर व्यक्त केला.