पंतप्रधान मोदींचा इस्रायल दौरा; अँटी-बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसह शस्त्रास्त्रांचा मोठा करार होण्याची शक्यता!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 09:53 IST2026-02-21T09:52:41+5:302026-02-21T09:53:26+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ आणि २६ फेब्रुवारी रोजी इस्रायलच्या ऐतिहासिक दौऱ्यावर जात आहेत.

पंतप्रधान मोदींचा इस्रायल दौरा; अँटी-बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसह शस्त्रास्त्रांचा मोठा करार होण्याची शक्यता!
पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ आणि २६ फेब्रुवारी रोजी इस्रायलच्या ऐतिहासिक दौऱ्यावर जात आहेत. या दोन दिवसीय दौऱ्यात भारत आणि इस्रायलमधील धोरणात्मक संबंध एका नव्या उंचीवर पोहोचण्याची शक्यता आहे. विशेषतः संरक्षण क्षेत्रात दोन्ही देश आता केवळ खरेदी-विक्रीपुरते मर्यादित न राहता, आधुनिक शस्त्रास्त्रांच्या सह-निर्मितीवर भर देणार आहेत. यामध्ये अँटी-बॅलिस्टिक मिसाइल, लेझर वेपन्स आणि लांब पल्ल्याच्या विनाशक क्षेपणास्त्रांचा समावेश असेल.
'मिशन सुदर्शन'ला मिळणार बळ
भारताच्या 'मिशन सुदर्शन'अंतर्गत देशाला शत्रूच्या क्षेपणास्त्रांपासून वाचवण्यासाठी एक अभेद्य सुरक्षा कवच तयार केले जात आहे. इस्रायलकडे 'एरो', 'डेव्हिड स्लिंग' आणि 'आयरन डोम' सारखी जगातली सर्वोत्तम संरक्षण यंत्रणा आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून भारत स्वतःची अँटी-बॅलिस्टिक मिसाइल सिस्टम विकसित करण्यावर या दौऱ्यात महत्त्वपूर्ण चर्चा करणार आहे. इस्रायल आता असे तंत्रज्ञान भारतासोबत शेअर करण्यास तयार आहे, जे त्यांनी यापूर्वी कोणत्याही देशाला दिलेले नाही.
लेझर शस्त्रे आणि हाय-टेक ड्रोन्सवर लक्ष
इस्रायलचे 'लेझर बेस्ड डिफेन्स सिस्टम' हे तंत्रज्ञान अत्यंत स्वस्त आणि अचूक मानले जाते. या दौऱ्यात लेझर आधारित शस्त्रास्त्रे, शत्रूच्या सीमेत शिरून मारा करणारे अत्याधुनिक ड्रोन्स आणि नौसेनेसाठी 'बराक' मिसाइलच्या नव्या आवृत्तीवर महत्त्वपूर्ण करार होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या काही वर्षांत भारत आणि इस्रायलमधील हा संरक्षण व्यापार १० अब्ज डॉलर्सच्या पार जाऊ शकतो.
नेतान्याहूंकडून भारताचे भरभरून कौतुक
पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याची घोषणा स्वतः इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी एका जाहीर कार्यक्रमात केली. "भारत ही एक महाशक्ती असून मोदींचे इस्रायलमध्ये स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत," असे त्यांनी म्हटले आहे. या दौऱ्यात मोदी इस्रायलच्या संसदेला संबोधित करण्याचीही शक्यता आहे.
शेती आणि तंत्रज्ञानातही होणार प्रगती
केवळ संरक्षणच नाही, तर सूक्ष्म सिंचन, कृषी तंत्रज्ञान, पाणी शुद्धीकरण आणि क्वांटम कॉम्प्युटिंग यांसारख्या भविष्यवेधी क्षेत्रांतही दोन्ही देशांमधील सहकार्य वाढवण्यासाठी चर्चा होणार आहे. दहशतवादाच्या विरोधात दोन्ही देशांची भूमिका एकसमान असल्याने हा दौरा जागतिक राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.