विमान कंपन्यांसाठी 'काळ' ठरला डिसेंबर; एकाच महिन्यात 6 मोठ्या अपघातात 234 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 19:01 IST2024-12-29T19:00:16+5:302024-12-29T19:01:06+5:30
Plane Crash: डिसेंबर 2024 मध्ये झालेल्या विमान अपघातानंतर सुरक्षा प्रोटोकॉल आणि विमान वाहतूक क्षेत्रातील तांत्रिक समस्यांबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

file photo
South Korea Plane Crash: दक्षिण कोरियातील मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज (29 डिसेंबर 2024) 181 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या जेजू एअरच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या घटनेत 179 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर दोघांना वाचवण्यात यश आले. दरम्यान, 2024 चा शेवटचा महिना विमान कंपन्यांसाठी मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नाही. या महिन्यात (29 डिसेंबर 2024) आतापर्यंत 6 मोठे विमान अपघात झाले आहेत, ज्यामध्ये एकूण 234 लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत विमान वाहतूक क्षेत्रातील सुरक्षा प्रोटोकॉल आणि तांत्रिक समस्यांबाबत आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दक्षिण कोरियातील अपघातात 179 जणांचा मृत्यू
आज सकाळी मुआन इंटरनॅशनल येथे झालेल्या विमान अपघातात 179 जणांचा मृत्यू झाला, तर दोन जणांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर काढले. बँकॉकहून परतणाऱ्या या विमानाचा गीअर लँडिंगच्या वेळी उघडला नाही, त्यामुळे विमान धावपट्टीवरून घसरले आणि थेट काँक्रीटच्या सुरक्षा भींतीला धडकले. आदळल्यानंतर विमानातून आगीचा मोठा गोळा बाहेर आला, त्यामुळे सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.
अझरबैजान एअरलाइन्सचा अपघात
25 डिसेंबर 2024 रोजी अझरबैजान एअरलाइन्सचे एम्ब्रेर ERJ-190AR कझाकस्तानमधील अकताऊ विमानतळाजवळ क्रॅश झाले होते, ज्यामध्ये 38 लोक ठार झाले होते. हे विमान बाकूहून ग्रोझनीला जात होते. तांत्रिक अडचणी आणि खराब हवामानामुळे विमानाची ग्रोझनी विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केली जात होती, यावेळी अपघात झाला.
ब्राझील विमान अपघातात 10 ठार
22 डिसेंबर रोजी दक्षिण ब्राझीलमधील ग्रामाडो शहरात खासगी विमान कोसळून एका कुटुंबातील दहा जणांचा मृत्यू झाला. या विमानाचे उड्डाण करणारे ब्राझीलचे व्यापारी लुईझ क्लॉडिओ गॅलेझी यांची पत्नी, तीन मुली आणि इतर नातेवाईकांसह या अपघातात मृत्यू झाला. विमान रहिवासी भागात कोसळले. या घटनेत त्या ठिकाणी उपस्थित असलेले 17 जण जखमी झाले आहेत
पापुआ न्यू गिनी विमान अपघात
नॉर्थ कोस्ट एव्हिएशनद्वारे संचालित ब्रिटन-नॉर्मन BN-2B-26 आयलँडर 22 डिसेंबर रोजी पापुआ न्यू गिनीमध्ये क्रॅश झाला, त्यात सर्व पाच जणांचा मृत्यू झाला. हे विमान वासू विमानतळावरून ला-नादजाबला जात होते. दुसऱ्या दिवशी या विमानाचे अवशेष सापडले, मात्र कोणीही वाचले नाही. या घटनेचा तपास अजूनही सुरू आहे.
अर्जेंटिनामध्ये विमान कुंपणाला धडकले
अर्जेंटिना येथील सॅन फर्नांडो विमानतळाजवळ बॉम्बार्डियर BD-100-1A10 चॅलेंजर 300 क्रॅश झाला आणि दोन्ही पायलट ठार झाले. हे विमान पुंता डेल एस्टे विमानतळावरून सॅन फर्नांडोला जात होते. लँडिंग केल्यानंतर विमानाचा वेग वाढला आणि विमान कुंपणाला धडकले.
होनोलुलू विमानतळाजवळ इमारतीला विमान धडकले
कामाका एअरचे उड्डाण विमान इनौये आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ क्रॅश झाले, त्यात दोन्ही पायलट ठार झाले. एटीसी कम्युनिकेशन्सनुसार, उड्डाणानंतर लगेचच विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते एका इमारतीवर आदळले. प्रशिक्षणादरम्यान ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.