घराच्या दारावर त्याने तीन वर्ष केली मालकीणीची प्रतिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 15:23 IST2017-11-23T15:14:59+5:302017-11-23T15:23:26+5:30
आपल्या मालकाची वाट बघत त्याने ३ वर्ष मालकाच्या घराबाहेर राखणदारी केली पण मालक काय घरी परतलाच नाही.

घराच्या दारावर त्याने तीन वर्ष केली मालकीणीची प्रतिक्षा
बुसान - कुत्रा हा प्रामाणिक प्राणी आहे हे आपण अगदी लहानपणापासून शिकत आलोय. आपल्या घराचं संरक्षण व्हावं याकरताही रखवालदार म्हणून कुत्र्याला पाळलं जातं. त्याच्या प्रामाणिकपणाची अनेक उदाहरणंही सांगितली जातात. त्याचप्रमाणे दक्षिण कोरियातील एका कुत्र्याने केलं आहे. आपल्या मालकाची वाट बघत त्याने ३ वर्ष मालकाच्या घराबाहेर राखणदारी केली.
आणखी वाचा - अद्भुत जपानविषयी थोडंफार, एकाच बेटावर राहतात 100 लोक आणि 400 मांजरी
दक्षिण कोरियातील बुसान शहरातील एका रस्त्यावरील कुत्र्याला एका ज्येष्ठ महिलेने ताब्यात घेतलं. या महिलेने त्या कुत्र्याला फू शी असं नावही दिलं. त्या दोघांमध्ये छान मैत्रीही झाली. दोघंही एकमेंकाच्या सानिध्यात मस्त वेळ व्यतीत करत होते. फू शी आता त्या महिलेच्या आयुष्यातील महत्वाचा भाग झाला होता. मात्र त्यांच्यातील हे नातं फार काळ टिकलं नाही. त्या महिलेला ब्रेन हॅब्म्रेज झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान तिचा मृत्यूही झाला. मात्र आपली मालकीन या जगातच राहिली नसल्याचं त्या कुत्र्याला ठाऊकच नव्हतं. आपली मालकीण आज येईल, उद्या येईल याविचाराने तो कुत्रा जवळपास ३ वर्ष त्या महिलेच्या घराबाहेर राहून पाळत ठेवत होता. दिवसभर रस्त्यावर भटकून सायंकाळ झाली की घरी परतत होता.
आणखी वाचा - चालकाने २० वर्षांपूर्वी पार्क केलेली कार सापडली भंगारात
आपली मालकीण आपल्याला भेटायला येईल या आशेने त्याने तिच्या घराबाहेरच राखणदारी करायला सुरुवात केली. शेजारचे-पाजारचे जे काही अन्न टाकत त्यावर तो स्वत:ची गुजराण करत असे. मात्र एकेदिवशी भटक्या प्राण्यांची देखभाल करणाऱ्या संस्थेने या कुत्र्याला पकडून आपल्या संस्थेत नेलं. शेजारच्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा कुत्रा गेल्या तीन वर्षांपासून इथेच घराच्या दारापाशी राहतोय. रात्रभर तो इकडे आपल्या मालकीणीची वाट पाहत बसतो. मात्र मालकीण आली नाही म्हणून सकाळी उठून रस्त्यावर भटकत बसतो. पुन्हा सायंकाळ झाली की घरी परततो.
आणखी वाचा - या भाग्यवान महिलेला तीन आठवड्यात तीनदा लागली लॉटरी
भटक्या कुत्र्याची देखभाल करणाऱ्या संस्थेत नेल्यावर या कुत्र्याची तपासणी केली तेव्हा त्याच्या आतड्याला सुज आल्याचं स्पष्ट झालं होतं. यामुळे त्याला फार त्रास होत होता. पशू डॉक्टरांनी त्याच्यावर योग्य उपचार केले आणि तो अगदी व्यवस्थित आहे. त्यानंतर या कुत्र्याची ही कहाणी सोशल मीडियावर बरीच व्हायरल झाली. आता एका कुटूंबाने या कुत्र्याला दत्तक घेतलं असून तो त्यांच्यासोबत अगदी आनंदात आहे.
आणखी वाचा : अशा चित्र-विचित्र जरा हटके बातम्यांसाठी इथे क्लिक करा