बांगलादेशात विकृती...! हिंदू विधवेवर सामूहिक बलात्कार; झाडाला बांधून मारहाण, केस कापले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 10:54 IST2026-01-06T10:53:05+5:302026-01-06T10:54:14+5:30
Bangladesh Crime News: शाहीन आणि हसन या नराधमांनी हिंदू विधवेच्या घरात घुसून केला अत्याचार. नातेवाईकांना कोंडले.

बांगलादेशात विकृती...! हिंदू विधवेवर सामूहिक बलात्कार; झाडाला बांधून मारहाण, केस कापले...
ढाका: शेजारील देश असलेल्या बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. गेल्या तीन आठवड्यांत सहा हिंदूंची हत्या करण्यात आली आहे. धर्मांध झालेले बांगलादेशी विकृत एवढ्यावरच थांबलेले नाहीत. एका हिंदू विधवेला क्रूरतेचा बळी बनवण्यात आले आहे.
नराधमांनी पीडित महिलेवर सामूहिक बलात्कार केला. तसेच तिचे केस कापून तिला विवस्त्र अवस्थेत झाडाला बांधून मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे स्थानिक हिंदू समाजात भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे. काही समाजकंटकांनी पीडित महिलेच्या घरात घुसून तिचे अपहरण केले. आरोपींनी तिच्यावर अत्याचार केला. पीडितेने प्रतिकार केला असता, तिला बेदम मारहाण करण्यात आली. आरोपींचे क्रौर्य एवढ्यावरच थांबले नाही; त्यांनी महिलेचे केस कापले आणि तिला एका झाडाला बांधून पळ काढला. पहाटे काही ग्रामस्थांना ही महिला त्या अवस्थेत दिसल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला.
पीडित महिलेने हिंमत दाखवत सोमवारी दुपारी कालीगंज पोलीस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध रितसर तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत एका संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव हसन (४५ वर्ष) असल्याचे समोर आले आहे. हसन हा पीडितेच्या परिसरातीलच एका गावातील रहिवासी असून, तो या गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभागी असल्याचा संशय आहे. उर्वरित तीन आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी छापे टाकले आहेत.
नातेवाईकांना कोंडले...
शनिवारी संध्याकाळी पीडितेचे दोन पुरुष नातेवाईक तिला भेटायला आले होते. हीच संधी साधून शाहीन आणि हसन घरात घुसले. त्यांनी नातेवाईकांना एका खोलीत कोंडून ठेवले. नराधमांनी महिलेला दुसऱ्या खोलीत नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
अल्पसंख्याक हिंदू लक्ष्य?
बांगलादेशात सत्तापालट झाल्यापासून हिंदू मंदिरं, घरं आणि महिलांना लक्ष्य केले जात असल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. मानवाधिकार संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेतले असल्याचे सांगितले जात आहे, मात्र अद्याप मुख्य आरोपी मोकाट आहेत.