पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 21:54 IST2025-11-20T21:53:42+5:302025-11-20T21:54:03+5:30
Pakistan -China Clash: पाकिस्तानमध्ये काम करणाऱ्या अनेक चिनी कंपन्यांवर मोठा घोटाळा केल्याचा आरोप आहे. या कंपन्या 'उत्पादन कमी दाखवून' मोठ्या प्रमाणावर करचोरी करत असल्याचे उघड झाले आहे.

पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये काम करणाऱ्या अनेक चिनी कंपन्यांवर मोठा घोटाळा केल्याचा आरोप आहे. या कंपन्या 'उत्पादन कमी दाखवून' मोठ्या प्रमाणावर करचोरी करत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे संतापलेल्या शहबाज शरीफ सरकारने या कंपन्यांना कडक इशारा दिला आहे.
"एकतर आपले संपूर्ण उत्पादन उघड करा, अन्यथा आपले कामकाज ताबडतोब बंद करा," असा थेट इशारा फेडरल बोर्ड ऑफ रेव्हेन्यूचे अध्यक्ष राशिद लैंग्रियल यांनी चीनी कंपन्यांच्या प्रतिनिधींना दिला आहे.
नेमका घोटाळा काय?
पाकिस्तानी संसदेच्या सिनेटच्या फायनान्स स्टँडिंग कमिटीच्या बैठकीत हा करचोरीचा प्रकार समोर आला. चीनच्या टाइल्स उत्पादन करणाऱ्या कंपन्या दरवर्षी सुमारे ३० अब्ज पाकिस्तानी रुपयांची करचोरी करत आहेत, असा अंदाज आहे.
कॅमेरा लावण्यास नकार
FBR ने सर्व सिरामिक फॅक्टरींमध्ये उत्पादनावर लक्ष ठेवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स-आधारित कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला. मात्र, चार चिनी कंपन्यांच्या प्रतिनिधींनी कमिटीसमोर या कॅमेऱ्यांना विरोध केला आहे. उत्पादन लाईनवर कॅमेरे लावल्यास त्यांच्या 'ट्रेड सीक्रेट्स'चा खुलासा होऊ शकतो, असे सांगत चिनी कंपन्यांनी यास विरोध केला. हा दावा लैंग्रियल यांनी फेटाळून लावला. एफबीआरने कंपन्यांना मदत म्हणून कॅमेऱ्यांची संख्या १६ वरून केवळ पाचपर्यंत कमी करण्याची तयारी दर्शवली होती, तरीही चिनी व्यवस्थापनाने कॅमेरे लावण्यास नकार दिला. याच पार्श्वभूमीवर लैंग्रियल यांनी स्पष्ट शब्दांत 'काम बंद करा' असा इशारा दिला आहे.