पाकचे गिरे तो भी टांग उपर; लष्करप्रमुख मुनीरचे प्रमोशन, फिल्ड मार्शल पदावर बढती;
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 12:07 IST2025-05-21T12:07:07+5:302025-05-21T12:07:36+5:30
म्हणे..., भारतासोबतच्या संघर्षात यशस्वी नेतृत्व

पाकचे गिरे तो भी टांग उपर; लष्करप्रमुख मुनीरचे प्रमोशन, फिल्ड मार्शल पदावर बढती;
इस्लामाबाद : भारताबरोबर नुकत्याच झालेल्या संघर्षात यशस्वी नेतृत्व केल्याबद्दल पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना मंगळवारी फिल्ड मार्शल पदावर बढती देण्यात आली, अशी माहिती पाकिस्तानची सरकारी वृत्तवाहिनी ‘पीटीव्ही’ने मंगळवारी दिली. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा अजब निर्णय घेण्यात आला. भारताकडून सपाटून मार खाल्ल्यानंतरही पाकिस्तानची मग्रुरी कायम असल्याचेच या निर्णयातून दिसून आले आहे.
पीटीव्ही वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, जनरल असीम मुनीर यांना फिल्ड मार्शल पद देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पाक मंत्रिमंडळाने घेतला. फिल्ड मार्शल हे पाकिस्तान लष्करातील सर्वोच्च पद असून, त्यावर विराजमान असलेली व्यक्ती लष्कराचे नेतृत्व, नियंत्रण आणि प्रशासन या तीनही गोष्टींसाठी जबाबदार असते. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित सर्व बाबींसाठी फिल्ड मार्शल हा पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांचा मुख्य सल्लागार असतो. यापूर्वी, १९५९ साली तत्कालीन राष्ट्रपती जनरल अयुब खान यांनी स्वतःला फिल्ड मार्शल पदावर बढती दिली होती.
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. पाकिस्तानने केलेले सर्व हल्ले हाणून पाडले. तरीही जनरल असीम मुनीर यांनी या संघर्षात पाकिस्तानी लष्कराचे यशस्वी नेतृत्व केल्याचे कौतुक पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केले. त्यांना फिल्ड मार्शल पदावर बढती
दिली. त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पाकिस्तानच्या तिप्पट भारतीय लष्कराकडून मारा
भारतीय लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तानी लष्कराने भारतीय लष्करी ठिकाणांवर केलेले सर्व हल्ले हाणून पाडण्यात आले. त्यासाठी स्वदेशी बनावटीची आकाशदीप रडार प्रणाली अतिशय उपयोगी ठरली. पाकव्याप्त काश्मीरमधील लीपा व्हॅलीतही भारताने मोठा मारा केला. पाकिस्तानने हल्ला केला की भारत त्याच्या तिप्पट प्रमाणात मारा करत आहे. भारताने केलेला प्रतिहल्ला इतका जबरदस्त होता की पाक कमांडरने लष्करी मालमत्तेपेक्षा सैनिकांचे प्राण कसे वाचतील यावर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश दिले.
पाकिस्तानचा ढोंगीपणा चव्हाट्यावर
ऑपरेशन सिंदूरसंदर्भात भारताची भूमिका जागतिक स्तरावर मांडण्यासाठी सात शिष्टमंडळे लवकरच विविध देशांत जाणार आहेत. त्यातील तीन शिष्टमंडळांतील सदस्यांना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पाकिस्तानच्या दीर्घकाळ सुरू असलेल्या भारतविरोधी दहशतवादी कारवायांसंदर्भात मंगळवारी सविस्तर माहिती दिली. भारत कोणत्याही हल्ल्यास ठोस उत्तर देण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांवर कारवाई करू, असे म्हणणाऱ्या पाकने सतत दहशतवाद्यांची पाठराखण केली आहे. त्याचा हा ढोंगीपणा आम्ही जगासमोर आणणार आहोत.
‘राणाला दिले तसे पाकने हाफिज सईदला भारताच्या ताब्यात द्यावे’
मुंबईवर २००८ साली झालेल्या हल्ल्याच्या कटातील तहव्वुर हुसेन राणा याला अमेरिकेने जसे भारताच्या हवाली केले, तसेच पाकिस्ताननेही हाफिज सईद, साजिद मीर, झकीऊर रहमान नक्वी या दहशतवाद्यांना भारताच्या स्वाधीन करावे, अशी मागणी इस्रायलमधील भारताचे राजदूत जे. पी. सिंग यांनी केली.
‘ऑपरेशन सिंदूर’वरून भाजप
आणि काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर
‘ऑपरेशन सिंदूर’वरून भाजप आणि काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर सुरू आहे. भाजपने राहुल गांधींना ‘मीर जाफर’ म्हटल्यावर काँग्रेसने परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना ‘जयचंद’ असे संबोधले. त्यानंतर वाद वाढत गेला.
भाजप नेते अमित मालवीय यांनी मंगळवारी याची सुरुवात केली. त्यांनी दोन पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट केले. एका फोटोमध्ये, राहुल गांधींचा चेहरा पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यासोबत जोडण्यात आला होता.
उत्तराखंडमध्ये सर्व मदरशांच्या अभ्यासक्रमात ‘ऑपरेशन सिंदूर’
लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ची गाथा उत्तराखंडमधील मदरशांच्या अभ्यासक्रमांत समाविष्ट केली जाणार आहे. राज्य मदरसा बोर्डाने ही घोषणा केली. मदरशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘ऑपरेशन सिंदूर’ काय आहे आणि त्याची गरज का पडली, याची माहिती व्हावी म्हणून या मोहिमेचा अभ्यासक्रमातच समावेश करणार आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’चा समावेश करून नवा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी लवकरच समितीची बैठक बोलावली जाईल, असे बोर्डाचे अध्यक्ष मुफ्ती शमून कासमी यांनी सांगितले.