पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 17:33 IST2025-12-17T17:33:09+5:302025-12-17T17:33:33+5:30
अफगाणिस्तानचा हा प्रोजेक्ट प्रत्यक्षात उतरला, तर सीमाभागातील वाढत्या तणावाबरोबरच 'पाणी' हा देखील अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाचा एक नवा मुद्दा ठरू शकतो.

पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
सिंधु जल करारावरून भारताने घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर आता अफगाणिस्तानहीपाकिस्तानचे पाणी रोखण्याच्या तयारीत आहे. अफगाणिस्तानमधील तालिबान सरकार कुनार नदीचा प्रवाह वळवण्याची योजना आखत असून, यामुळे पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
कुनार नदीचा प्रवाह वळवण्याचा प्रस्ताव -
'अफगाणिस्तान टाइम्स'च्या वृत्तानुसार, तालिबान सरकारच्या आर्थिक आयोगाच्या तांत्रिक समितीने कुनार नदीचे पाणी नांगरहारमधील दारुंता धरणाकडे वळवण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या प्रस्तावावर अंतिम मोहोर लागल्यानंतर, अफगाणिस्तानमधील शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर दूर होईल. मात्र पाकिस्तानला त्याचा मोठा फटका बसेल. ५०० किमी लांबीची ही नदी हिंदूकुश पर्वतरांगातून उगम पावून अफगाणिस्तानातून वाहत पुन्हा पाकिस्तानात प्रवेश करते आणि पुढे सिंधू नदीला मिळते.
पाकिस्तानसमोर उभे राहणार दुहेरी संकट -
कुनार नदीचे पाणी पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा आणि पंजाब प्रांतातील सिंचन, पिण्याचे पाणी आणि जलविद्युत प्रकल्पांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. भारताने आधीच सिंधू जल करार रद्द केल्याने पाकिस्तान चिंतीत आहे. यातच आता अफगाणिस्तानने पाणी रोखल्यास पाकिस्तानची स्थिती अधिकच बिकट होईल. महत्वाचे म्हणजे, भारतासोबत पाकिस्तानचा पाण्यासंदर्भात लेखी करार होतता. मात्र, अफगाणिस्तानसोबत त्यांचा असा कोणताही करार नाही. यामुळे, पाकिस्तानला तालिबानवर दबाव आणणे तांत्रिकदृष्ट्या अत्यंत कठीण जाणार आहे.
अफगाणिस्तानचा हा प्रोजेक्ट प्रत्यक्षात उतरला, तर सीमाभागातील वाढत्या तणावाबरोबरच 'पाणी' हा देखील अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाचा एक नवा मुद्दा ठरू शकतो.