पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 19:20 IST2025-10-02T19:19:10+5:302025-10-02T19:20:04+5:30
Pakistan Shahbaz Sharif PoK Issue: पाकव्याप्त काश्मीर गमावण्याच्या भीतीने पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी निवेदन जारी केले आहे

पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
Pakistan Shahbaz Sharif PoK Issue: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध गेल्या काही महिन्यांपासून तणावाचे झाले आहेत. तशातच पाकव्याप्त काश्मीरमध्येही प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) तीन दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसक आंदोलकांमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तिसऱ्या दिवशी ददयालमध्ये आंदोलक आणि पाकिस्तानी रेंजर्स यांच्यात संघर्ष झाला. निदर्शने दडपण्यासाठी सरकारने हजारोंचे सैन्य तैनात केले आहे. मात्र मुझफ्फराबादच्या पलीकडे असलेल्या रावलकोट, नीलम व्हॅली आणि कोटलीसह इतर भागात हिंसाचाराचा परिणाम झाला आहे आणि पाकव्याप्त काश्मीर गमवावे लागते की काय, अशी चिंता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना सतावू लागली आहे. त्यामुळे त्यांनी या प्रकरणावर एक निवेदन जारी केले आहे.
शरीफ निवेदनात म्हणतात की, कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या संस्थांनी आंदोलकांशी संयमाने वागावे, सार्वजनिक भावनांचा आदर करावा आणि आवश्यक नसल्यास कोणतीही कठोर कारवाई टाळावी. शाहबाज यांनी घटनेची पारदर्शक चौकशी करण्याचे आणि मृतांच्या कुटुंबीयांना त्वरित मदत करण्याचेही निर्देश दिले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून पीओकेमध्ये पीपल्स अॅक्शन कमिटी निदर्शनांचे नेतृत्व करत आहे. बुधवारी, आंदोलक आणि पोलिसांमधील संघर्षात तीन पोलिसही ठार झाले आणि १५० जण जखमी झाले आहेत.
PoK मध्ये सध्या काय घडतंय?
२९ सप्टेंबरला अवामी कृती समिती (AAC)च्या नेतृत्वाखाली आंदोलक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आणि अनिश्चित काळासाठी 'बंद आणि चक्का जाम' संप पुकारला. अवामी कृती समितीच्या नेतृत्वाखाली हजारो लोकांनी आंदोलने केली. वीजेवरील अनुदान बंद करण्याची आणि काश्मिरी निर्वासितांसाठी राखीव असलेल्या १२ विधानसभेच्या जागा रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
पाकिस्तानसाठी PoK महत्त्वाचे का?
पाकव्याप्त काश्मीर हे पाकिस्तानसाठी सामरिक, आर्थिक, भौगोलिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे आहे. गिलगिट-बाल्टिस्तानचा नकाशा त्यांचे सामरिक आणि भौगोलिक महत्त्व दर्शवितो. कारण या मार्गाशिवाय पाकिस्तानचे ग्वादार बंदर चीनसाठी काहाही कामाचे नसेल. येथूनच चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (CPEC) जातो, जो पाकिस्तानमार्गे चीनला मध्य आणि पश्चिम आशियाशी जोडतो.