पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 10:44 IST2025-08-10T10:42:34+5:302025-08-10T10:44:59+5:30
२३ एप्रिल रोजी भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले होते.

पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
पाकिस्तान हा भारताचा शेजारी देश असला, तरी दोन्ही देशांतील संबंध नेहमीच तणावपूर्ण राहिले आहेत. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर आखून दहशतवाद्यांची तळे नष्ट केली. या दरम्यान भारताने सिंधु जल करार देखील स्थगित केला. यामुळे पाकिस्तानचे पाणी बंद झाले. यानंतर पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले होते. मात्र,आता असे करणे पाकिस्तानलाच खूप महागात पडले आहे.
भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद केल्याने पाकिस्तानला दोन महिन्यांत १२०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे एका अहवालात उघड झाले आहे. २३ एप्रिल रोजी भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले होते.
भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षामुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. ही माहिती पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयानेच दिली आहे. पाकिस्तानच्या संसदेत सांगण्यात आले की हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे दररोज १०० हून अधिक उड्डाणांवर परिणाम होत आहे. यामुळे २४ एप्रिल ते ३० जून दरम्यान पाकिस्तानला ४.१० अब्ज पाकिस्तानी रुपयांचे (सुमारे १२४० कोटी भारतीय रुपये) नुकसान झाले आहे.
पाकिस्तानचे आधीच मोठे नुकसान
पाकिस्तानने अनेक वेळा आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. पाकिस्तानने भारतासाठी आपले हवाई क्षेत्र बंद करण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१९ मध्येही पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र बंद केले होते. त्या काळात पाकिस्तानला ५४ दशलक्ष डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागले. त्यावेळी भारत-पाकिस्तान सीमेवर खूप तणाव होता. याच कारणामुळे पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र बंद केले.
भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र सध्या बंद!
भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षानंतर संबंधांमध्ये बरीच कटुता निर्माण झाली आहे. ऑपरेशन सिंदूर आणि सिंधू पाणी कराराद्वारे भारताने पाकिस्तानला कठोर धडा शिकवला आहे. यामुळेच पाकिस्तान संतापला आहे. संघर्ष संपल्यानंतरही काही महिने पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद ठेवले आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ते बंद राहणार असल्याचे बोलले जात आहे.