"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 07:35 IST2025-05-07T07:29:08+5:302025-05-07T07:35:09+5:30
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी प्रतिक्रिया दिली

"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय हवाई दलाने मंगळवारी मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीर आणि इतर भागात हवाई हल्ले केले. भारताने मुझफ्फराबाद, कोटली, गुलपूर, बिंबर, सियालकोट, चक आमरू, मुरीदके आणि बहावलपूर येथील दहशतवादी तळांना लक्ष्य केले आहे. भारताच्या हवाई हल्ल्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शाहबाज शरीफ यांनी सोशल मीडिया एक्सवर प्रतिक्रिया देताना पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार असल्याचे म्हटलं आहे.
पाकिस्तानी लष्कराने भारतीय हल्ल्यांना दुजोरा दिला आहे आणि हे हल्ले भारतीय हवाई हद्दीतून करण्यात आल्याचे म्हटले आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ही कारवाई केली आहे. भारताच्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याचेही विधान समोर आले आहे. पाक सैन्याने सांगितले की, ६ ठिकाणी २४ हल्ले करण्यात आले. यामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३३ जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानने या हल्ल्यांचा निषेध केला आहे आणि प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही आम्ही जशास तसे प्रत्युत्तर देणार आहे असं म्हटलं आहे.
"शत्रूने पाकिस्तानच्या पाच ठिकाणांवर भ्याड हल्ला केला आहे. भारताच्या या हल्ल्याला 'अॅक्ट ऑफ वॉर'(युद्धाची कृती) असं म्हटलं जाईल. भारताच्या या हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार पाकिस्तानला आहे. आणि आम्ही जशास तसे प्रत्युत्तर देत आहोत. संपूर्ण पाकिस्तान लष्करासोबत उभा आहे आणि देशाचं मनोधैर्य मजबूत आहे," असे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले.