पाकिस्तानला महागाईचा महाधक्का! पेट्रोल-डिझेलच्या दरात एकाच वेळी ५५ रुपयांची वाढ; इंधन दरवाढीने जनता होरपळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 04:09 IST2026-03-07T04:08:55+5:302026-03-07T04:09:17+5:30
Pakistan Petrol-Diesel Price Hike: पाकिस्तानमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात लिटरमागे ५५ रुपयांची प्रचंड वाढ! इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक तेल संकटामुळे सरकारने घेतला मोठा निर्णय.

पाकिस्तानला महागाईचा महाधक्का! पेट्रोल-डिझेलच्या दरात एकाच वेळी ५५ रुपयांची वाढ; इंधन दरवाढीने जनता होरपळली
इस्लामाबाद : आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानच्या जनतेला सरकारने पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे. पाकिस्तानमधीलपेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत थेट ५५ रुपये प्रति लिटर इतकी प्रचंड वाढ करण्यात आली आहे. इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक तेल संकटामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे पाकिस्तानच्या पेट्रोलियम मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
काय आहेत नवे दर?
पाकिस्तान सरकारने जाहीर केलेल्या नवीन दरवाढीनंतर इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत:
डिझेल: आता ३३५.८६ रुपये प्रति लिटर.
पेट्रोल: आता ३२१.१७ रुपये प्रति लिटर.
इराण युद्धाचा परिणाम:
मध्यपूर्वेतील इराण युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत तेल आणि गॅसचा पुरवठा विस्कळीत होण्याची भीती आधीपासूनच व्यक्त केली जात होती. पाकिस्तानने या संकटाचा सामना करण्यासाठी आणि आपली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी इंधनाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या दरवाढीमुळे पाकिस्तानातील वाहतूक खर्च वाढणार असून, त्याचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होणार आहे.
जनतेमध्ये संतापाची लाट
आधीच महागाईने कंबरडे मोडलेल्या पाकिस्तानी जनतेसाठी ही दरवाढ 'दुष्काळात तेरावा महिना' ठरली आहे. सत्तेवर आलेल्या नव्या सरकारसमोर आता या जनक्षोभाला सामोरे जाण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.