पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला; सगळाच खेळ उलटा पडला, आपलेच लोक मारले? नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 12:22 IST2024-12-25T12:21:55+5:302024-12-25T12:22:57+5:30
या हल्ल्याचे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे अफगाणिस्तानने म्हटले आहे...

प्रतिकात्मक फोटो
पाकिस्ताननेअफगाणिस्तानात हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात 15 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचा दावा तालिबानकडून केला जात आहे. तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने बरमल, पक्तिकावर रात्रीच्या सुमारास पाकिस्तानने केलेल्या एअर स्ट्राइकवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. या हल्ल्याचे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे अफगाणिस्तानने म्हटले आहे.
खरे तर यावेळी संबंधित मंत्रालयाने आपली भूमी आणि सार्वभौमत्वाच्या संरक्षणावर भर दिला आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, "पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात वझिरीस्तानच्या निर्वासितांना लक्ष्य करण्यात आले. हे लोक निर्वासित म्हणून पाकिस्तानातून अफगाणिस्तानात आले आहेत. या हल्ल्यातील मृतांमध्ये अनेक लहान मुले आणि महिलांचाही समावेश आहे." अशा परिस्थितीत, पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हल्ला करून आपलेच लोक मारले का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
या हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी अद्याप कसलीही पुष्टी केलेली नाही. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानी सेन्याच्या जवळच्या सूत्रांचे म्हणणे आहेकी, या एअर स्ट्राइकच्या माध्यमाने सीमावर्ती भागातील तालिबानच्या ठिकाणांवर हल्ला करण्यात आला आहे. पाकिस्तानी तालिबानने पाकिस्तानी संरक्षणदलांवरील आक्रमण अधिक वाढवले आहे. तसेच, अफगान तालिबान पाकिस्तानी दहशतवाद्यांचे हल्ले रोखण्यासाठी आपल्याला सहकार्य करत नाही, असा दावा पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केला आहे.
तालिबानी संरक्षण मंत्रालयाने फेटाळून लावले पाकिस्तानचे दावे -
तालिबान संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इनायतुल्लाह ख्वारजमी यांनी पाकिस्तानी संरक्षण सूंत्रांकडून करण्यात आलेले सर्व दावे फेटाळून लावले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट शेअर करत, ख्वारजमी म्हणाले, "या हवाई हल्ल्यात सर्वसामान्य नागरिक मारले गेले आहेत. यात प्रामुख्याने वझिरिस्तानी शरणार्थ्यांचा समावेश आहे."
ख्वारेझमी म्हणाले, "या हल्ल्यात अनेक मुले, महिला आदी नागरिक मारले गेले आहेत, तसेच जखमी झाले आहेत. मात्र, मृतांचा नेमका आकडा अद्याप समजू शकलेला नाही. आतापर्यंत महिला आणि लहान मुलांसह 15 मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहेत. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.