पाकिस्तानची शक्कल! 'काश्मीर' प्रश्नावर भारताच्या मित्रासोबत केली हातमिळवणी; संयुक्त निवेदन जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 09:28 IST2026-02-05T09:25:35+5:302026-02-05T09:28:33+5:30

या संयुक्त निवेदनात दोन्ही देशांनी प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर त्यांच्यातील एकमत व्यक्त केले.

Pakistan Joined hands with India friend Kazakhstan on 'Kashmir' issue; Joint statement issued | पाकिस्तानची शक्कल! 'काश्मीर' प्रश्नावर भारताच्या मित्रासोबत केली हातमिळवणी; संयुक्त निवेदन जारी

पाकिस्तानची शक्कल! 'काश्मीर' प्रश्नावर भारताच्या मित्रासोबत केली हातमिळवणी; संयुक्त निवेदन जारी

इस्लामाबाद - कझाकस्तानचे राष्ट्रपती कासिम-जोमार्ट टोकायेव यांच्या पाकिस्तान दौऱ्यात एक संयुक्त निवेदन जारी करण्यात आलं आहे. धोरणात्मक भागीदारीच्या नावाखाली जारी केलेल्या या निवेदनात काश्मीरचा उल्लेख करत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) ठरावांद्वारे हा प्रश्न सोडवण्याचे म्हटले आहे. भारताविरोधातपाकिस्तानने ही शक्कल लढवली आहे. भारत कायम काश्मीरला द्विपक्षीय मुद्दा मानतो, त्यात तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप अथवा जागतिक व्यासपीठावर याचा उल्लेख याला कडाडून विरोध केला आहे.

कझाकस्तान, ज्याचे भारतासोबत मजबूत व्यापारी आणि धोरणात्मक संबंध आहेत त्यांनी पाकिस्तानसोबत संयुक्त निवेदनात जम्मू काश्मीरच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावाला समर्थन देण्याची भाषा वापरली आहे. दक्षिण आशियातील शांततेसाठी जम्मू काश्मीर वाद संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत ठराव मांडून समाधानकारक तोडगा काढायला हवा असं पाकिस्तान आणि कझाकस्तान यांनी संयुक्त निवेदनात म्हटलं आहे. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय कायद्याच्या सार्वत्रिक तत्त्वांचे आणि निकषांचे पालन करण्यावर या निवेदनात भर देण्यात आला.

या संयुक्त निवेदनात दोन्ही देशांनी प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर त्यांच्यातील एकमत व्यक्त केले. बहुपक्षीय व्यासपीठांवर एकमेकांच्या प्रयत्नांना आणि उमेदवारांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली. दक्षिण आशियातील शांतता आणि सुरक्षिततेवर चर्चा करताना नेत्यांनी सर्व बाजूंनी संयम आणि जबाबदार वर्तनाचे आवाहन केले. शिवाय निवेदनात अफगाणिस्तानातील परिस्थितीवर देखील लक्ष केंद्रित केले गेले, जिथे प्रादेशिक सहकार्यासाठी स्थिरता आणि सुरक्षितता आवश्यक मानली जात आहे. अफगाणिस्तानचा भूभाग इतर कोणत्याही देशाच्या सुरक्षेविरुद्ध वापरला जाऊ नये असं दोन्ही देशांनी पुनरुच्चार केला. त्यांनी आंतर-धार्मिक, सांस्कृतिक आणि जातीय सद्भावना, धार्मिक सहिष्णुता वाढवणे आणि इस्लामोफोबियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय प्रयत्नांना पाठिंबा देण्याचे मान्य केले.

कझाकस्तान हा जगातील सर्वात मोठा भूपरिवेष्टित देश आहे. माजी सोव्हियत संघाच्या राज्यांपैकी हा एक आहे. रशिया, चीन, किर्गिस्तान, तुर्कमेनिस्तान, उज्बेकिस्तानसारख्या ५ देशांच्या सीमा या देशाला लागून आहेत. भारत हा कझाकस्तानला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देणाऱ्या पहिल्या काही देशांपैकी एक आहे. १९९२ पासून कझाकस्तानसोबत भारताचे संबंध चांगले आहेत. १९९३ मध्ये भारत कझाकस्तान यांच्यात द्विपक्षीय व्यापार, आर्थिक, वैज्ञानिक तंत्रज्ञान, औद्योगिक आणि सांस्कृतिक भागीदारी विकसित करण्यात येत आहे. मध्य आशियातील भारताचा सर्वात मोठा व्यापार आणि गुंतवणूक भागीदार कझाकस्तान देश आहे. भारत आणि कझाकस्तान यांच्यात अनेक सैन्य सराव झाले आहेत. दहशतवादविरोधी अभियानही या दोन्ही देशांनी एकत्रित राबवले आहे. त्यामुळे जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावर कझाकस्तानने घेतलेली भूमिका भारताला धक्का देणारी आहे.

Web Title : कश्मीर मुद्दे पर पाकिस्तान ने कजाकिस्तान से मिलाया हाथ, भारत को झटका

Web Summary : पाकिस्तान ने कजाकिस्तान के साथ मिलकर कश्मीर मुद्दे पर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद के प्रस्तावों का समर्थन किया। भारत इसे द्विपक्षीय मामला मानता है। कजाकिस्तान के इस कदम से भारत को झटका लगा है। बयान में क्षेत्रीय सुरक्षा पर भी चर्चा हुई।

Web Title : Pakistan enlists Kazakhstan on Kashmir, issues joint statement against India.

Web Summary : Pakistan, with Kazakhstan, addressed Kashmir in a joint statement, backing UNSC resolutions. This move challenges India's stance on bilateral discussions. Despite strong ties with India, Kazakhstan supported Pakistan's position. The statement also covered regional security and Afghanistan.