कर्जबाजारी पाकिस्तानचा ओव्हर कॉन्फिडन्स; फायटर जेट विकून IMF चे कर्ज फेडण्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 15:15 IST2026-01-09T15:15:21+5:302026-01-09T15:15:54+5:30
पाकिस्तानला IMF च्या कर्जाची गरज नाही; ख्वाजा आसिफांचे वक्तव्य चर्चेत!

कर्जबाजारी पाकिस्तानचा ओव्हर कॉन्फिडन्स; फायटर जेट विकून IMF चे कर्ज फेडण्याचा दावा
Pakistan IMF : पाकिस्तानची ढासळलेली अर्थव्यवस्था आणि वाढते कर्ज हे वास्तव कुणापासूनही लपलेले नाही. देश गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. अशातच, पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केलेल्या एका दाव्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)च्या मदतीशिवाय पुढील सहा महिने पाकिस्तानला कोणतीही आर्थिक अडचण भासणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे.
जिओ न्यूजवरील विधानामुळे वाद
मंगळवारी जिओ न्यूजवरील एका कार्यक्रमात बोलताना ख्वाजा आसिफ यांनी पुढील सहा महिन्यांत पाकिस्तानला IMF कडून कोणत्याही आर्थिक मदतीची आवश्यकता भासणार नाही, असे सांगितले. तसेच, मे महिन्यात भारतासोबत झालेल्या संघर्षानंतर पाकिस्तानच्या लष्करी विमानांना आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक मागणी वाढल्याचा दावाही त्यांनी केला. या कार्यक्रमात त्यांनी असेही म्हटले की, भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान संपूर्ण जगाने पाकिस्तानची सैन्यशक्ती आणि निर्धार पाहिला. त्यांच्या या वक्तव्यांमुळे पाकिस्तानमध्येच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
वास्तव वेगळेच...
प्रत्यक्षात, संबंधित लष्करी कारवाईदरम्यान भारताने पाकिस्तान व पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर लक्ष्य केंद्रीत हल्ले केल्याचे सर्वश्रृत आहे. या कारवाईत दहशतवादी संघटनांचे अनेक प्रशिक्षण केंद्रे भारतीय सैन्याकडून उद्ध्वस्त करण्यात आले. भारताने याचे पुरावेही सादर केले आहेत. भारतीय कारवाईत पाकिस्तानचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, पाकिस्तानच्या लष्करी पायाभूत सुविधांना फटका बसल्याचे विविध अहवालांमधून समोर आले आहे.
‘ओव्हर कॉन्फिडन्स’ मागचे कारण काय?
ख्वाजा आसिफ यांच्या आत्मविश्वासामागे काही आंतरराष्ट्रीय घडामोडी कारणीभूत असल्याचे मानले जाते. अलीकडेच बांगलादेशचे वायुसेना प्रमुख पाकिस्तान दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पाकिस्ताननिर्मित JF-17 ब्लॉक-3 लढाऊ विमान खरेदीबाबत रस दाखवल्याची माहिती आहे. याशिवाय, दोन पाकिस्तानी सूत्रांच्या हवाल्याने Reutersने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यात सुमारे 2 अब्ज डॉलरचे कर्ज JF-17 लढाऊ विमानांच्या करारात रुपांतरित करण्याबाबत चर्चा सुरू आहे. या शक्यतांमुळे पाकिस्तानमध्ये अतिआत्मविश्वास वाढल्याचे चित्र दिसते.
IMF वर अवलंबून असलेली पाकिस्तानची अर्थव्यवस्था
पाकिस्तानची अर्थव्यवस्था दीर्घकाळापासून IMF च्या मदतीवरच अवलंबून आहे. देशावर सध्या सुमारे 7.41 अब्ज डॉलरचे कर्ज असून, सर्वाधिक कर्जबाजारी देशांच्या यादीत पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर अर्जेंटिना तर दुसऱ्या क्रमांकावर युक्रेन आहे. सप्टेंबर 2024 मध्ये IMF ने पाकिस्तानसाठी 7 अब्ज डॉलरच्या बेलआउट पॅकेजला मंजुरी दिली होती. त्यानंतर मे 2025 मध्ये ‘क्लायमेट रेजिलिएन्स फंड’ अंतर्गत आणखी 1.4 अब्ज डॉलरचे कर्ज देण्यात आले. देशाची आर्थिक स्थिरता आणि हवामान बदलाशी संबंधित आव्हानांचा सामना करण्यासाठी ही मदत देण्यात आली होती.
दावे आणि वास्तवात तफावत
एकीकडे पाकिस्तान IMF च्या कर्जावर देश चालवत असताना, दुसरीकडे संरक्षणमंत्र्यांकडून आर्थिक स्वावलंबनाबाबत हास्यास्पद दावे केले जाताहेत. त्यामुळे ख्वाजा आसिफ यांचे विधान हे राजकीय आशावाद आहे की, वास्तवाची जाणीव नसलेले वक्तव्य, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.