Pakistan Bilawal Bhutto on India : भुट्टो म्हणाले, “भारतासोबतचे संबंध संपवून फायदा होणार नाही”; पाकिस्तानशी संबंध पुन्हा सुधारणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 22:10 IST2022-06-16T22:04:42+5:302022-06-16T22:10:13+5:30
Bilawal Bhutto On India Pakistan Relation: पाकिस्तानच्या नव्या सरकारला भारतासोबतचे संबंध सुधारण्याची इच्छा असल्याचे दिसून येत आहे. अगोदरच नवे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी तसे संकेत दिले आहेत आणि आता पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांचे वक्तव्यही तसेच आहे.

Pakistan Bilawal Bhutto on India : भुट्टो म्हणाले, “भारतासोबतचे संबंध संपवून फायदा होणार नाही”; पाकिस्तानशी संबंध पुन्हा सुधारणार?
Bilawal Bhutto On India Pakistan Relation: इम्रान खान यांच्या कार्यकाळात बिघडलेले भारत आणि पाकिस्तानचे संबंध पुन्हा रुळावर येण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी आपल्या वक्तव्यात हे संकेत दिले आहेत. गुरुवारी बिलावल इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीजच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राजधानी इस्लामाबादमध्ये पोहोचले.
पाकिस्तानी विद्यार्थ्यांना संबोधित करताना बिलावल भुट्टो यांनी भारतासोबतचे संबंध पुन्हा सुधारण्यावर भर दिला. “पाकिस्तान आधीच आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकी पडला आहे. भारतासोबतचे संबंध तोडणे देशाच्या हिताचे नाही,” असे भुट्टो यांनी विद्यार्थ्यांशी बोलताना सांगितले. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान एकाकी पडल्याबद्दल बिलावल भुट्टो यांनी यापूर्वी सत्तेत असलेल्या इम्रान खान सरकारला जबाबदार धरले. आम्हाला वारशात असा एक देश मिळालाय जो चहुबाजूंनी संकंटांनी घेरलेला असल्याचेही म्हणत त्यांनी इम्रान खान यांच्यावर निशाणा साधला.
काय फायदा होईल?
“जर पाकिस्तानचा परराष्ट्र मंत्री म्हणून मी भारत सरकार किंवा तेथील नागरिकांशी चर्चा केली नाही, तर पाकिस्तानचा हेतू पूर्ण होईल का? भारतासोबतचे संबंध तोडून पाकिस्तानला फायदा होईल का,” असा सवालही बिलावल भुट्टो यांनी उपस्थितांना केला. भारतासोबत संबंध पुन्हा प्रस्थापित करू नये असं लोक सांगतात. पाकिस्तानसाठी अशाप्रकारचं पाऊल उचलणं अयोग्य ठरेल. मी चांगल्या संबंधांना पाठिंबा देतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कलम ३७० चा उल्लेख
भारतासोबत आमचे अनेक प्रश्न आहेत. दोन्ही देशांमध्ये युद्ध आणि संघर्षांचा मोठा इतिहास आहे. सध्याही दोन्ही देशांतील संबंध ताणले गेले आहेत. २०१९ च्या घटलेला हलक्यात घेता येणार नाही. जेव्हा जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतला तेव्हा दोन्ही देशांमध्ये दरी निर्माण झाल्याचंही त्यांनी सांगितलं.
शरीफ यांनीही केला होता उल्लेख
यापूर्वी जून महिन्याच्या सुरूवातील पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारतासह अन्य देशांशी परस्पर सहकार्याची इच्छा व्यक्त केली होती. भारतासह अन्य देशांसोबत भू आर्थिक रणनितीसाठी करार करण्याची इच्छा असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.