इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 08:56 IST2025-06-20T08:43:49+5:302025-06-20T08:56:40+5:30
इस्रायलविरुद्ध सुरू असलेल्या युद्धात इराणकडून कोणत्याही लष्करी मदतीची विनंती मिळालेली नाही, असे पाकिस्तानने गुरुवारी सांगितले.

इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
इराण आणि इस्त्रायलमध्ये सुरु असलेल्या तणावामध्ये आता पाकिस्तानने मोठे विधान केले आहे. इस्रायलविरुद्ध सुरू असलेल्या युद्धात इराणकडून कोणत्याही लष्करी मदतीची विनंती मिळालेली नाही, असे पाकिस्तानने गुरुवारी सांगितले. यावेळी त्यांनी इराणला स्वतःचे रक्षण करण्याचा अधिकार आहे असा आग्रह धरला.
परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते शफकत अली खान म्हणाले, "इराणबाबत पाकिस्तानची भूमिका स्पष्ट आणि पारदर्शक आहे. आम्ही इराणला पूर्ण नैतिक पाठिंबा देतो. आम्ही इराणवरील आक्रमणाचा तीव्र निषेध करतो. हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे."
शफकत अली खान म्हणाले, इराणच्या सीमेवरील पाकिस्तानमध्ये इराणी निर्वासितांना आश्रय देण्याची तेहरानकडून कोणतीही विनंती आलेली नाही. २१ मुस्लिम देशांनी संयुक्त निवेदनात इराणवरील इस्रायली आक्रमणाला नकार दिला आहे आणि इस्रायलची कृती आंतरराष्ट्रीय कायदा आणि संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरच्या विरुद्ध असल्याचे वर्णन केले आहे.
इराणची परिस्थिती पाकिस्तानसाठी चिंतेचे विषय
"इराणची परिस्थिती पाकिस्तानसाठी चिंतेचे विषय आहे. यावेळी शफकत अली खान यांनी इस्त्रायलला हल्ले थांबवण्याची विनंती केली. इराण-इस्रायल संघर्षावर वाटाघाटीद्वारे तोडगा काढण्यास पाकिस्तान पाठिंबा देतो, असंही ते म्हणाले.
पाकिस्तान चिंतेत
जर इस्रायलशी संघर्षामुळे इराणमध्ये अस्थिरता निर्माण झाली तर इराणच्या सीमेवरील फुटीरतावादी आणि जिहादी त्याचा फायदा घेऊ शकतात, ही भीती पाकिस्तानला भीती आहे.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या भेटीत ही चिंता व्यक्त केली. पाकिस्तानच्या चिंतेचे आणखी एक कारण म्हणजे इस्रायलने इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर केलेला हल्ला चुकीचा आदर्श ठेवू शकतो.