pakistan faces shortage of cotton after ending trade relation with india | पाकमध्ये आता कापसाची कमतरता, भारताशी व्यापारी संबंध तोडणं पडलं महागात
पाकमध्ये आता कापसाची कमतरता, भारताशी व्यापारी संबंध तोडणं पडलं महागात

ठळक मुद्देभारताकडून स्वस्तात कापूस खरेदी पाकिस्तानने स्वतः हून बंद केली आहे. कापसाची आयात करण्यासाठी आता जास्त पैसे मोजावे लागत आहेत. औषधे आणि वैद्यकीय उपकरणांचाही तुटवडा निर्माण झाला आहे.

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्ताननेभारतासोबत व्यापार संबंध तोडले होते. मात्र त्यांचा हा निर्णय पाकिस्तानच्या अंगलट आल्याचं दिसून आलं आहे. व्यापारावर बंदी घालणं चांगलंच महागात पडत आहे. पाकिस्तानमधील सर्वसामान्य जनता महागाईने होरपळत आहे. भारताकडून स्वस्तात कापूस खरेदी पाकिस्तानने स्वतः हून बंद केली आहे. त्यामुळे कापसाची आयात करण्यासाठी त्यांना आता जास्त पैसे मोजावे लागत आहेत. तसेच औषधे आणि वैद्यकीय उपकरणांचाही तुटवडा निर्माण झाला आहे.

पाकिस्तानमधील 'द न्यूज'ने दिलेल्या माहितीनुसार, कापूस उत्पादनात घट झाली आहे. पाकिस्तानला स्वतः ची गरज पूर्ण करण्यासाठी परदेशातून महाग कापूस आयात करावा लागू शकतो. तसेच पाकिस्तान कॉटन जिनर्स असोसिएशनच्या (पीसीजीए) आकडेवारीचा हवाला देत सूत उत्पादनात 26.54 टक्क्यांची घसरण झाल्याचा उल्लेखही यामध्ये करण्यात आला होता.

पाकिस्तानमध्ये यावर्षी कापसाचे उत्पादन कमी आहे. मात्र भारतात कापसाचे उत्पादन हे गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक आहे. भारतीय कॉटन संघटनेच्या अंदाजानुसार, यावर्षी कापसाचे उत्पादन 354 लाख गाठ राहू शकतं तर गेल्या वर्षी हे उत्पादन 312 लाख गाठ होतं. सीमावर्ती देश असल्यामुळे पाकिस्तानला भारतातून कापूस विकत घेणं वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत सोयीचं आणि स्वस्त आहे. मात्र व्यापार बंद झाल्यामुळे भारताकडून कापूस खरेदीही बंद झाली आहे. भारतीय कापसाचा सध्याचा दर 69 सेंट प्रति पौंड आहे, तर आंतरराष्ट्रीय बाजारात हाच दर 74 सेंट प्रति पौंड आहे. त्यामुळे भारताकडून कापूस खरेदी पाकिस्तानला तुलनेने स्वस्त आहे.

व्यापार बंदीला एक महिना झाल्यानंतर पाकिस्तान भारतासमोर झुकला आहे. जीवनावश्यक औषधांच्या कमतरतेनंतर पाकिस्तानने काही दिवसांपूर्वी भारतातून अंशत: व्यापारावरील बंदी उठविली आहे. भारतातून जीवनावश्यक औषधांची आयात करण्याला मंजूरी दिली आहे. पाकिस्तान भारताला फळे, सिमेंट, खनिज, रबर, अल्कहोल पेय, चिकित्सा उपकरण या प्रकारच्या अनेक वस्तू निर्यात करतं. तर भारत पाकिस्तानला जैविक रसायन, प्लास्टिक उत्पादन, धान्य, साखर, कॉफी, चहा, लोह आणि स्टीलचे सामान, औषधे इ. वस्तू निर्यात करते. 

पाकिस्तान मोठ्या प्रमाणात भारताकडून औषधे आयात करते. या जीवनावश्यक औषधात साप, कुत्रा यांच्या विषापासून वाचवण्याचं औषधासाठी पाकिस्तानला भारतावर निर्भर राहावं लागतं. जुलै महिन्यात आलेल्या रिपोर्टनुसार पाकिस्तानने 16 महिन्याच्या कालावधी भारताकडून 250 कोटींहून अधिक किमतीचा व्यापार विषापासून वाचविणाऱ्या औषधांवर केला होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2017-18 मध्ये 2.4 अरब डॉलर व्यापार झाला होता. द्विपक्षीय व्यापारात जवळपास 80 टक्के भाग पाकिस्तानमध्ये भारतीय निर्यात वस्तूंचा असतो. 

 

Web Title: pakistan faces shortage of cotton after ending trade relation with india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.