पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांना मारू, इराणचाही पाकला 'सुलेमानी दम'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 16:52 IST2019-03-04T16:44:27+5:302019-03-04T16:52:27+5:30
पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांकडून होणाऱ्या त्रासाला इराणनेही तीव्र शब्दात इशारा दिला आहे.

पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांना मारू, इराणचाही पाकला 'सुलेमानी दम'
इराणच्या आयआरजीसी फोर्सचे कमांडर जनरल कासीम सुलेमानी यांनी पाकिस्तान सरकार आणि लष्कराला धमकी दिली आहे. पाकिस्तान हा शेजारी देशांच्या सीमावर्ती भागात अशांतता निर्माण करण्यासाठी कारणीभूत आहे. तुम्ही कुठल्या दिशेने चालला आहेत ?. इराणचा संयम पाहू नका, अशा शब्दात कासीम सुलेमानी यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे.
पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांकडून होणाऱ्या त्रासाला इराणनेही तीव्र शब्दात इशारा दिला आहे. जर, पाकिस्तानने इराणवर होणाऱ्या दहशतवादी कारवायांना खतपाणी घातले, तर इराणही पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानला धडा शिकवेल, असे इराणच्या आयआरजीसी फोर्सचे कमांडर कासीम सुलेमानी यांनी म्हटले आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांचा इराणलाही नाहक त्रास होतो. या संघटनांवर पाकिस्तानकडून कुठलिही कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे इराणही पाकिस्तानच्या सीमारेषेवर भींत बांधण्याची योजना आखत आहे. तर, इराणनेही भारताप्रमाणे कारवाई करण्याचे संकेत पाकिस्तानला दिले आहेत. इराणच्या परराष्ट्र धोरणाचे प्रमुख हेशमातोल्लाह फलाहतफिशेह यांनीही पाकिस्तानला दम भरला आहे. तर अली जाफरी यांनीही पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशाराच दिला आहे. अली जाफरी हे आयआरजीसीचे कमांडर आहेत.
भारत आणि इराणकडून संयुक्तपणे पाकिस्तानातील दहशतवादाचा खात्मा करण्यासंदर्भात चर्चा झडत आहे. त्यासाठी भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले हे इराणच्या दौऱ्यावरही जाणार होते. मात्र, पुलवामा हल्ला आणि एअर स्ट्राईकमुळे गोखले यांचा हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. त्यातच, इराणचे कमांडर सोलेमनी यांनी पाकिस्तानला इशारा देत दहशतवादाविरुद्ध भारत-इराण यांच्या घनिष्ट मैत्रीचे संकेत दिले आहेत. दरम्यान, सुलेमानी हे अरब देशातील दहशतवादाविरोधात कार्य करतात, असा त्यांचा दावा आहे. तर काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील वॉशिंग्टन टाईम्स या वृत्तपत्राने कासिम सुलेमानी यांना जगातील सर्वात मोठा दहशतवादी असल्याचं संबोधल होतं.