पाकिस्तानच्या हाती लागला मोठा खजिना; देशाची गरिबी दूर होणार? पीएम शरीफ म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 15:31 IST2026-01-02T15:29:55+5:302026-01-02T15:31:08+5:30
Pakistan Claims Oil Gas Discovery: पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात हा शोध लागला आहे.

पाकिस्तानच्या हाती लागला मोठा खजिना; देशाची गरिबी दूर होणार? पीएम शरीफ म्हणाले...
Pakistan Claims Oil Gas Discovery: पाकिस्तानने खैबर पख्तूनख्वा प्रांतात कच्च्या तेलाचे आणि नैसर्गिक वायूचे नवे साठे सापडल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानी एजन्सींनुसार, कोहट जिल्ह्यातील नश्पा ब्लॉकमध्ये ही शोधमोहीम यशस्वी ठरली. पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी या शोधाला देशासाठी मोठी उपलब्धी ठरवत, यामुळे परकीय चलन साठा मजबूत होईल आणि तेल-गॅस आयातीवरील खर्च कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
कोहट जिल्ह्यातील नश्पा ब्लॉकमध्ये शोध
पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, खैबर पख्तूनख्वा प्रांतातील कोहट जिल्ह्यातील नश्पा ब्लॉकमध्ये तेल आणि वायूचे साठे सापडले आहेत. येथून दररोज सुमारे 4,100 बॅरल कच्चे तेल आणि 10.5 मिलियन क्युबिक फूट नैसर्गिक वायू उत्पादन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
पाक सरकारचे म्हणणे आहे की, या नव्या शोधामुळे देशाच्या ऊर्जा गरजा पूर्ण करण्यात मदत होईल आणि परदेशातून तेल-गॅस आयात करण्यावरील अवलंबित्व कमी होईल. पेट्रोलियम आणि गॅस क्षेत्रावरील उच्चस्तरीय बैठकीत बोलताना पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सांगितले की, स्थानिक पातळीवरील तेल-गॅस शोधामुळे परकीय चलन साठ्याला बळकटी मिळेल आणि खरेदीवरील खर्चात घट होईल.
OGDCL कडून अधिकृत पुष्टी
पाकिस्तानची सरकारी कंपनी OGDCL ने नश्पा ब्लॉकमध्ये तेल आणि वायू सापडल्याची अधिकृत पुष्टी केली आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या शोधाबद्दल पंतप्रधानांनी OGDCL आणि संबंधित सर्व एजन्सींचे अभिनंदन केले आहे.
2026 पर्यंत 3.5 लाख नवीन गॅस कनेक्शनचे लक्ष्य
बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, यावर्षी ग्राहकांना पुरेशी गॅस पुरवठा करण्यात आला आहे. आता सरकारचे उद्दिष्ट जून 2026 पर्यंत 3.5 लाख नवीन गॅस कनेक्शन देण्याचे आहे. पाक सरकार या शोधाकडे ऊर्जा क्षेत्रातील मोठे संकेत म्हणून पाहत आहे.
संसाधने आहेत, पण विकासावर प्रश्नचिन्ह
मात्र, पाकिस्तान याआधीही बलुचिस्तानमध्ये तेल-गॅस साठे सापडल्याचे दावे करत आला आहे. खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमधील स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, त्यांच्या भागातील नैसर्गिक संसाधनांचा वापर केला जातो, मात्र त्यातून मिळणारी कमाई स्थानिक विकासासाठी खर्च होत नाही.
खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान मागास का?
खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान हे प्रांत अजूनही पंजाबच्या तुलनेत मागास मानले जातात. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, पाकिस्तानी लष्कर, राजकारण आणि प्रशासनात पंजाबचा प्रभाव अधिक आहे, तर त्यांच्या प्रदेशातील संसाधनांचा लाभ त्यांनाच मिळत नाही. याच कारणामुळे या भागांत दीर्घकाळापासून असंतोष आणि आंदोलनांची स्थिती आहे.