Asim Munir Son information : पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर यामुळे पाकिस्तानमधील एक नाव चर्चेत आले आहे. ते नाव म्हणजे असीम मुनीर. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर गेल्या काही दिवसांपासून भारताला सातत्याने अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी देताना दिसत आहेत. याचदरम्यान, अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना असीम मुनीर यांनी भारताला उद्देशून मोठे विधान केले आहे. मुनीर यांच्या मते, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध कधीही थांबू शकत नाही. ते पुढे असेही म्हणाले की, माझ्या पश्चात्त माझा मुलगा भारताविरोधात लढेल आणि त्यानंतर माझा नातू भारताविरुद्ध युद्ध सुरू ठेवेल. आपल्या मुलाबद्दल असीम मुनीर यांनी केलेले विधान सध्या चर्चेत आहे. जाणून घेऊया असीम मुनीर यांचा मुलगा काय करतो?
भारताविरूद्ध लढण्याची भाषा करणाऱ्या असीम मुनीरने ऑपरेशन सिंदूरदरम्यान, आपल्या कुटुंबाला पाकिस्तानाबाहेर पाठवले होते. एवढेच नाही तर, ज्या रात्री भारताने रावळपिंडीवर हल्ला केला होता, त्या रात्री मुनीर आपला जीव वाचवण्यासाठी लष्कराच्या मुख्यालयाच्या बंकरमध्ये लपून बसला होता. मात्र आता तोच मुनीर भारताविरूद्ध युद्धाच्या वल्गना करताना दिसतो आहे.
मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो?
३ मुलांचे वडील असलेले असीम मुनीर २०२२ पासून पाकिस्तानचे लष्करप्रमुख पद भूषवत आहेत. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांचे लग्न इरम नक्वी-मुनीर यांच्याशी झाले. इरम आणि असीम यांना ३ मुले आहेत. दोन मुली आणि एक मुलगा. दोन्ही मुली मोठ्या आहेत आणि लंडनमध्ये राहतात. ज्येष्ठ पाकिस्तानी पत्रकार अहमद नूरानी यांनी २०२२ मध्ये मुनीर कुटुंबावर एक रिपोर्टिंग केले होते. मुनीरच्या मोठ्या मुलीचे नाव खादीजा असीम आहे. खादीजाचे लग्न ब्रिटनमधील सुरक्षा विभागात तैनात असलेल्या उस्मानशी झाले आहे. नूरानीच्या मते, मुनीरच्या दुसऱ्या मुलीचे नाव सुंदास उझैर आहे. सुंदासचे लग्न उझैर अली शाहशी झाले आहे. उझैर पाकिस्तानी आहे. असीम मुनीरला एकुलता एक मुलगा आहे. त्याच्या मुलाने ब्रिटनमध्ये शिक्षण पूर्ण केले आहे आणि तो त्याची आई इरमसोबत तिथे राहतो. मुनीर कुटुंबाने त्यांच्या मुलाबद्दल अधिक माहिती सार्वजनिक केलेली नाही.
मुनीरच्या कुटुंबात आणखी कोण आहे?
मुनीरच्या कुटुंबात दोन भाऊ आहेत. एक भाऊ शिक्षक होता, जो आता निवृत्त झाला आहे आणि रावळपिंडीमध्ये राहतो. मुनीरचा धाकटा भाऊ धर्माधिष्ठित मोहिम चालवतो. मुनीरचे वडीलही पाकिस्तानमध्ये इमाम म्हणून काम करायचे. मुनीरशिवाय कुटुंबात कोणीही सैन्यात नाही. मुनीर हे पाकिस्तानचे दुसरे असे लष्करप्रमुख आहेत, ज्यांना पदावर असताना फील्ड मार्शल ही पदवी देण्यात आली आहे. मुनीर हे पाकिस्तानमध्ये पडद्याआडून सरकार चालवतात असा त्यांच्यावर अनेकदा आरोप केला जातो.