"इम्रान खान 'वेडा', त्याची विधाने देशाविरोधी अन् चिथावणीखोर"; पाकिस्तान आर्मीचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 19:17 IST2025-12-05T19:15:58+5:302025-12-05T19:17:33+5:30
Imran Khan mentally ill: इम्रान खान यांना पाकिस्तानी लष्कराने 'मानसिकदृष्ट्या आजारी' घोषित केले

"इम्रान खान 'वेडा', त्याची विधाने देशाविरोधी अन् चिथावणीखोर"; पाकिस्तान आर्मीचा मोठा दावा
Imran Khan mentally ill: आदियाला तुरुंगात कैद असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तानी लष्कराने 'वेडा' म्हणजेच 'मानसिकदृष्ट्या आजारी' घोषित केले आहे. लष्कराच्या प्रवक्त्याने एक औपचारिक निवेदन जारी केले आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की, इम्रान खान आता मानसिकरित्या आजारी आहेत. ते जी विधान करत आहेत ते सारेकाही देशविरोधी आहे. ते देशद्रोही लोकांची भाषा बोलू लागले आहेत. इम्रान खान तुरुंगातून नागरिकांना सैन्याविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण हे आता सहन केले जाणार नाही.
इम्रान खानची भाषा देशविरोधी
जिओ टीव्ही उर्दूनुसार, लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की, इम्रान खान देशविरोधी भाषा बोलत आहेत. ते प्रत्येक वक्तव्यात शेख मुजीबुर रहमान यांचे नाव घेत आहेत. हा देशाशी विश्वासघात आहे. १९७१ मध्ये पाकिस्तानची फाळणी मुजीबुर रहमान यांनीच केली होती. त्यांचा उल्लेख करणे देशविरोधी आहे.
तीन दिवसांत काय बदललं?
इम्रान खान आणि त्यांची बहीण उज्मा यांच्या भेटीनंतर अवघ्या तीन दिवसांतच इम्रान यांना 'वेडा' घोषित करण्यात आले. भावाला भेटल्यानंतर उज्मा यांनी त्यांना पूर्णपणे निरोगी असल्याचे म्हटले होते. मग प्रश्न असा आहे की, इम्रान खान अवघ्या तीन दिवसांत मानसिकरित्या आजारी कसे झाले? असा सवाल विचारला जात आहे.
लष्कराच्या निवेदनात आणखी काय?
अहमद शरीफ चौधरी यांच्या मते, कलम १९ अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत आहे. पण त्यात कुठेही असे म्हटलेले नाही की विरोधी पक्ष लोकशाहीची व्याख्या ठरवेल. आम्ही उच्चभ्रू वर्गातील नाही, म्हणून आमचा वापर केला जातो. प्रत्येक मुद्द्यात सैन्याला ओढले जाते. इम्रान खान प्रत्येक वेळी बैठकीत लष्करप्रमुखांविरुद्ध विधाने करत आहेत. "आम्ही कोणालाही पाकिस्तानी सैन्य आणि जनतेमध्ये दरी निर्माण करू देणार नाही. आम्ही तुम्हाला लोकांना सैन्याविरुद्ध भडकवू देणार नाही. आम्ही तुम्हाला सैन्य आणि जनता यांच्यात मतभेद निर्माण करण्याची संधी देणार नाही."