पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची 'ओपन वॉर'ची घोषणा; कतारचे प्रयत्न निष्फळ, अफगाणिस्तानचे झेंडे लावून अमेरिकन वाहने निघाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 08:11 IST2026-02-27T08:10:28+5:302026-02-27T08:11:42+5:30
Pakistan Afghanistan war Begins: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. काबुल, कंदहारमध्ये एअर स्ट्राईक तर तोर्खम सीमेवर दोन्ही सैन्यात गोळीबार सुरू आहे. वाचा सविस्तर वृत्त.

पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची 'ओपन वॉर'ची घोषणा; कतारचे प्रयत्न निष्फळ, अफगाणिस्तानचे झेंडे लावून अमेरिकन वाहने निघाली
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील सीमावाद आता पूर्णतः युद्धाच्या छायेत ओढला गेला आहे. "आमच्या संयमाची सीमा संपली असून आता हे 'ओपन वॉर' आहे," अशी अधिकृत घोषणा पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केली आहे. शुक्रवारी पहाटे पाकिस्तानने अफगाणिस्तानची राजधानी काबूल आणि कंदहारसह अनेक महत्त्वाच्या शहरांवर भीषण एअर स्ट्राईक केले आहेत.
पाकिस्तानच्या लष्करी शक्तीपुढे अफगाणिस्तान कुठेच नाहीय, पण त्यांच्याकडे लढवय्ये आहेत... पहा कोणाची किती ताकद...
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांच्या सीमेवर (ड्युरंड लाईन) तणाव वाढला होता. अफगाणिस्तानच्या तालिबान सैन्याने गुरुवारी रात्री उशिरा पाकिस्तानच्या सीमा चौक्यांवर मोठा हल्ला केला होता. तालिबानचा दावा आहे की, त्यांनी पाकिस्तानच्या १५ हून अधिक सीमा चौक्यांवर कब्जा मिळवला असून ५५ पाकिस्तानी सैनिकांना ठार केले आहे.
"आमच्या संयमाचा अंत झाला"
संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करत या युद्धाची अधिकृत पुष्टी केली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "आमच्या संयमाची सीमा आता ओलांडली गेली आहे. आता आमच्यात (पाकिस्तान) आणि तुमच्यात (अफगाणिस्तान) उघड युद्ध सुरू झाले आहे."
याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानच्या हवाई दलाने 'ऑपरेशन गजब लिल हक' अंतर्गत अफगाणिस्तानमधील दहशतवादी तळांना लक्ष केले. काबूल आणि कंदहारमध्ये विमानांचे आवाज आणि मोठे स्फोट ऐकू आल्याचे वृत्त आहे. तालिबान प्रवक्त्याने म्हटले आहे की, पाकिस्तानने नागरी वस्ती आणि निवासी भागात बॉम्बफेक केली आहे. त्यांनी प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानच्या बाजूने मोठी लष्करी कारवाई सुरू केली आहे. तालिबानने देखील अमेरिकेने सोडलेली युद्धक वाहने पाकिस्तानच्या सीमेकडे पाठविण्यास सुरुवात केली असून अफगाणिस्तानकडे हवाई हल्ले करण्यासाठी युद्धसामुग्री नसली तरी देखील जमिनीवरील लढाई सुरु होणार आहे.
पाकिस्तानचे म्हणणे
पाकिस्तानने असा दावा केला आहे की, टीटीपी (TTP) या दहशतवादी संघटनेचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी हे स्ट्राईक करण्यात आले आहेत. कतारने केलेला युद्धबंदीचा प्रयत्न आता पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसत आहे. या युद्धामुळे संपूर्ण दक्षिण आशियात चिंतेचे वातावरण असून, भारत, इराण आणि चीन या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
कंदहारवर घिरट्या आणि तोर्खम सीमेवर तणाव
तालिबानचे सर्वोच्च नेते हिबातुल्लाह अखुंदजादा यांचे निवासस्थान असलेल्या कंदहारमध्ये जेट विमानांच्या आवाजाने घबराट पसरली होती. नंगरहार प्रांतातील तोर्खम बॉर्डर क्रॉसिंगजवळ (Torkham Border) असलेल्या निर्वासितांच्या कॅम्पमध्ये मोर्टार पडल्याने सात जण जखमी झाले आहेत. यामध्ये एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.