कतारने मोठी चूक केली...! तालिबानने युद्धविरामातील एका शब्दावर तीव्र आक्षेप घेतला, निवेदन बदलण्याची वेळ आली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 09:03 IST2025-10-20T09:02:24+5:302025-10-20T09:03:27+5:30
Pakistan-Afghanistan Durand Line Conflict: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील युद्धविराम निवेदनातून कतारने 'सीमा' (Border) हा शब्द वगळला. तालिबानने ड्युरंड रेषेवर आक्षेप घेतल्याने हा बदल करण्यात आला.

कतारने मोठी चूक केली...! तालिबानने युद्धविरामातील एका शब्दावर तीव्र आक्षेप घेतला, निवेदन बदलण्याची वेळ आली...
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील नुकत्याच झालेल्या संघर्षविराम करारासंदर्भात मध्यस्थी करणाऱ्या कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाला त्यांच्या अधिकृत निवेदनात बदल करावा लागला आहे. अफगाणिस्तानच्या (तालिबान) तीव्र आक्षेपानंतर कतारने आपल्या मूळ निवेदनातील 'सीमा' हा शब्द वगळला आहे.
कतारने सुरुवातीला जारी केलेल्या निवेदनात, या युद्धविरामामुळे दोन्ही बंधुभाव असलेल्या देशांमधील सीमेवरील तणाव कमी होण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त केली होती. मात्र, अफगाण अधिकाऱ्यांनी या 'सीमा' शब्दावर लगेच आक्षेप घेतला. या शब्दाचा अर्थ ड्युरंड रेषा असा होतो, ज्याला अफगाणिस्तान कधीही अधिकृत सीमा मानत नाही.
कतरने बदलले निवेदन
अफगाणिस्तानच्या प्रतिक्रियेनंतर कतारने आपले निवेदन सुधारित केले आणि त्यातून 'सीमा' शब्द काढून टाकला. सुधारित निवेदनात आता, हा महत्त्वाचा शांतता करार दोन्ही बंधुभाव असलेल्या देशांमधील तणाव संपुष्टात आणण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे नमूद करण्यात आले आहे.
ड्युरंड रेषेचा जुना वाद:
ड्युरंड रेषा ही सुमारे २,६७० किलोमीटर लांबीची सीमा आहे, जी १८९३ मध्ये ब्रिटिश भारत आणि अफगाण शासक अमीर अब्दुर रहमान यांच्यात झालेल्या करारानुसार निश्चित करण्यात आली होती. १९४७ मध्ये पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळाल्यावर ही रेषा पाकिस्तानच्या वाट्याला आली, पण अफगाणिस्तानने आणि विशेषतः पश्तून समुदायाने तिला कधीही अधिकृत आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून मान्यता दिली नाही.
कतरने निवेदनात बदल करणे, ही प्रादेशिक राजनैतिक संवेदनशीलता लक्षात घेऊन शांतता प्रक्रिया पुढे नेण्यासाठी घेतलेली भूमिका मानली जात आहे.