पाकिस्तान-अफगाणिस्तान शस्त्रसंधी संकटात! एका ओळीवर अवलंबून, पाक संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 09:22 IST2025-10-21T09:22:29+5:302025-10-21T09:22:43+5:30
Pakistan-Afghanistan Tension: पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सोमवारी या करारावर मोठे विधान केले आहे.

पाकिस्तान-अफगाणिस्तान शस्त्रसंधी संकटात! एका ओळीवर अवलंबून, पाक संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान
इस्लामाबाद/काबुल: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील सीमावर्ती भागातील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. दोन्ही देशांदरम्यान कतार आणि तुर्कीच्या मध्यस्थीने झालेल्या युद्धविराम कराराला मोठा धोका निर्माण झाला आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सोमवारी या करारावर मोठे विधान केले आहे.
संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी स्पष्ट केले की, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील युद्धविराम करार हा केवळ एकाच अटीवर टिकून आहे. ते म्हणाले, अफगाणिस्तानमधून येणारी कोणतीही गोष्ट (घुसखोर किंवा हल्ले) या कराराचे उल्लंघन असेल. सर्व काही याच एका ओळीवर अवलंबून आहे.अफगाणिस्तानची सत्ता सांभाळणाऱ्या तालिबानने त्यांच्या भूमीचा वापर पाकिस्तानवर हल्ले करणाऱ्या घटकांना रोखण्यासाठी करणे आवश्यक आहे. हाच मुद्दा पाकिस्तान, अफगाणिस्तान, तुर्की आणि कतार यांनी केलेल्या मूळ करारात स्पष्टपणे नमूद करण्यात आला होता.
अफगाणिस्तानकडूनही पाकिस्तानला इशारा
दुसरीकडे, पाकिस्तानच्या या विधानानंतर अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयानेही कठोर प्रतिक्रिया दिली आहे. अफगाण संरक्षण मंत्री मोहम्मद याकूब मुजाहिद यांनी पाकिस्तानला सावध करत म्हटले आहे की, करारातील प्रत्येक कलमाचे पालन करणे सर्व पक्षांना बंधनकारक आहे.
मुजाहिद यांनी सांगितले की, काबूल (अफगाणिस्तान) या अटींचे पूर्णपणे पालन करण्यास कटिबद्ध आहे. मात्र, त्यांनी पाकिस्तानला इशारा दिला की, "जर पाकिस्तानने त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या नाहीत, तर त्यामुळे समस्या निर्माण होतील." तसेच, या कराराच्या अंमलबजावणीसाठी तुर्की आणि कतार या मध्यस्थ देशांनीही दोन्ही राष्ट्रांना मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.