BREAKING: पाकिस्तानी सैन्यावर दहशतवाद्यांचा मोठा हल्ला; कॅप्टनसह ११ जणांचा मृत्यू, काही जण ओलीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 20:02 IST2021-07-13T19:48:58+5:302021-07-13T20:02:16+5:30
खैबर पख्युतख्वा प्रांतात पाकिस्तानी लष्करावर मोठा दहशतवादी हल्ला

BREAKING: पाकिस्तानी सैन्यावर दहशतवाद्यांचा मोठा हल्ला; कॅप्टनसह ११ जणांचा मृत्यू, काही जण ओलीस
इस्लामाबाद: पाकिस्तानच्या खैबर पख्युतख्वा प्रांतात मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे कॅप्टन अब्दुल बासित यांच्यासह ११ सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तर १५ पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी काही सैनिकांना ओलीस ठेवल्याची माहितीदेखील समोर येत आहे. तहरीक-ए-तालिबान पाकिस्ताननं (टीटीपी) हा हल्ला केला असण्याची शक्यता आहे.
तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या दहशतवाद्यांविरोधात पाकिस्तानी लष्कराचं खुर्रम परिसरात ऑपरेशन सुरू होतं. याच मोहिमेदरम्यान टीटीपीच्या दहशतवाद्यांनी पाकिस्तानी जवानांवर हल्ला केला. कॅप्टन अब्दुल बासित खान या कारवाईचं नेतृत्व करत होते. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी ६ टेलिकॉम ऑपरेटर्सना ओलीस ठेवलं आहे.
टीटीपीचे सातत्यानं हल्ले
टीटीपी संघटना पाकिस्तानात सातत्यानं हल्ले करते. डिसेंबर २००७ मध्ये १३ दहशतवादी गटांनी एकत्र येऊन टीटीपीची स्थापना केली. पाकिस्तानात शरियावर आधारित कट्टरवादी इस्लामी शासन यावं हा टीटीपीचा हेतू आहे. पाकिस्तानातील टीटीपी अफगाणिस्तानात असलेल्या तालिबानपेक्षा वेगळी आहे. मात्र ही संघटना तालिबानच्या विचारधारेला पाठिंबा देते. टीटीपीनं पेशावरमध्ये १६ डिसेंबर २०१४ रोजी लष्करी विद्यालयावर हल्ला केला. त्यात जवळपास २०० लहान मुलं मारली गेली.