पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 11:36 IST2025-05-01T11:31:23+5:302025-05-01T11:36:04+5:30

बुधवारी पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनी सीमा रेषेजवळील चौक्या रिकाम्या करत चौक्यांवरील झेंडे उतरवले होते.

Pahalgam Attack Pakistan re installed flags on posts they were removed yesterday | पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

India-Pakistan Conflict: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील सक्रिय झाले असून ते सातत्याने दिल्लीत अधिकाऱ्यांच्या आणि मंत्र्‍यांच्या बैठका घेत आहेत. मंगळवारी त्यांनी तिन्ही सैन्याच्या प्रमुखांसोबत तर बुधवारी सीसीएस आणि सीसीपीएची बैठक घेतली होती. या सलग झालेल्या बैठकींमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणता तरी मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानकडूनही हालचाली सुरु झाल्या आहेत. बुधवारी पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनी सीमा रेषेजवळील चौक्या रिकाम्या करत चौक्यांवरील झेंडेही उतरवले होते. मात्र आता या चौक्यांवर पुन्हा झेंडे लावण्यात आले आहेत.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमारेषेवर प्रचंड तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. पहलगाममध्ये एका नेपाळी नागरिकासह २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले होते. गेल्या सात दिवसांपासून पाकिस्तानी लष्कराकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार करण्यात येत आहे. भारतीय लष्कराकडूनही त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. त्यानंतर पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनी सीमारेषेजवळील चौक्या रिकाम्या केल्या होत्या. तसेच चौक्यांवरील झेंडेही उतरवण्यात आले होते. मात्र आता आंतरराष्ट्रीय सीमेवरील कठुआ जिल्ह्यातील प्रग्याल येथील पाकिस्तानी चौक्यांवर पाक रेंजर्सनी पुन्हा नवीन झेंडे लावले आहेत. बुधवारी, जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरील अनेक चौक्यांवरील झेंडे काढून टाकण्यात आले होते.

दुसरीकडे, पहलगाम हल्ल्यानंतर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानने आता त्यांची गुप्तचर संस्था आयएसआयचे प्रमुख लेफ्टनंट जनरल असीम मलिक यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. २०२२ मध्ये मुईद युसूफ यांनी राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त होते. मलिक यांची नियुक्ती २९ एप्रिल रोजीच झाली होती. मात्र बुधवारी रात्री उशिरा त्याबाबत माहिती देण्यात आली. त्याआधीच भारत सरकारने एनएसए बोर्डाची पुनर्रचना केली आहे. रिसर्च अँड अॅनालिसिस विंगचे माजी प्रमुख आलोक जोशी यांना एनएसए बोर्डाचे नवे अध्यक्ष बनवण्यात आले आहे.

Web Title: Pahalgam Attack Pakistan re installed flags on posts they were removed yesterday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.