इराणमध्ये आमचं सैन्य पाठवणार नाही; ऐन युद्धात इस्रायलनं केलेल्या घोषणेनं अमेरिका पडली एकाकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 15:31 IST2026-03-30T15:28:27+5:302026-03-30T15:31:01+5:30
ही मोहीम पार पाडण्यासाठी अमेरिकन सैन्याला इराणमध्ये अनेक दिवस किंवा त्याहून अधिक काळ राहावे लागू शकते असं तज्ज्ञांनी सांगितले.

इराणमध्ये आमचं सैन्य पाठवणार नाही; ऐन युद्धात इस्रायलनं केलेल्या घोषणेनं अमेरिका पडली एकाकी
इराणसोबत सुरू असलेल्या युद्धात इस्रायलने अमेरिकेला मोठा धक्का दिला आहे. ग्राऊंड ऑपरेशनसाठी आमचे सैन्य इराणला जाणार नाही असं स्पष्ट शब्दात इस्रायलने सांगितले आहे. हा निर्णय देशाच्या सीमेवरील सुरक्षा कायम ठेवणे आणि दक्षिण लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहच्या विरोधात मोहिमेवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी घेतल्याचा दावा इराणी मीडियाकडून करण्यात येत आहे.
इस्रायलने म्हटलं की, आम्ही आमचे सागरी आणि हवाई अभियान सुरूच ठेवू परंतु इराणमध्ये जमिनीवरील कारवाई करणार नाही. इस्रायलचे हे पाऊल अमेरिकेसाठी मोठा धक्का मानले जाते. इस्रायलच्या या निर्णयाने जमिनी कारवाईत अमेरिका एकटी पडू शकते आणि त्यांच्यावर हा सगळा भार पडेल. जर अमेरिकेने इराणविरोधात जमिनीवरील कारवाई सुरू केली तर त्याला एकट्यालाच हे मिशन पूर्ण करावे लागेल. सोबतच इस्रायल अमेरिकेला तंत्रज्ञान सहाय्य आणि गुप्त माहितीच्या माध्यमातून मदत करणार नाही हे अद्याप स्पष्ट नाही.
इस्रायलने युद्धाबाबत त्यांची भूमिका अशा वेळी स्पष्ट केली जेव्हा वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टमध्ये अमेरिका इराणविरोधात जमिनीवरील कारवाईची तयारी करत आहे अशी बातमी प्रसारित झाली. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची अलीकडील वक्तव्ये आणि मध्य पूर्वेतील अमेरिकेची वाढती लष्करी उपस्थिती या शक्यतेला अधिक बळकटी देत आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती ही मोहीम सुरू करतील की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. जर अमेरिकेने ही लष्करी मोहीम सुरू केली तर ती धोकादायक ठरू शकते. ही मोहीम पार पाडण्यासाठी अमेरिकन सैन्याला इराणमध्ये अनेक दिवस किंवा त्याहून अधिक काळ राहावे लागू शकते असं तज्ज्ञांनी सांगितले.
दरम्यान, ट्रम्प अमेरिकन सैन्याला असलेल्या धोक्यांचा विचार करत आहेत. परंतु गरज पडल्यास तसे करण्यास ते तयार आहेत असं अमेरिकन अधिकाऱ्यांनी वॉल स्ट्रीट जर्नलला सांगितले. पेंटागॉन मध्य-पूर्वेत १०,००० पर्यंत अतिरिक्त सैन्य तैनात करत आहे असं पीटीआयने वृत्त दिले. २,५०० मरीन सैनिकांसह ३,५०० हून अधिक सैनिक मध्य-पूर्वेत दाखल झाले आहेत अशी माहिती अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने शनिवारी जाहीर केली.