...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 09:46 IST2025-07-15T09:45:10+5:302025-07-15T09:46:51+5:30
Donald trump India Pakistan Conflict 2025: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष मी रोखल्याचा दावा केला आहे.

...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
India Pakistan Conflict Donald trump: पाकिस्तानसोबत झालेल्या शस्त्रसंधी चर्चेत अमेरिकेची कोणतीही भूमिका नव्हती, सहभाग नव्हता असे भारताने स्पष्ट केले; पण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने हा संघर्ष थांबवल्याचे श्रेय घेत आहेत. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मी दोन्ही देशातील लष्करी संघर्ष थांबवल्याचा दावा केला. इतकंच नाही तर दोन्ही देशांमध्ये अण्वस्त्र युद्ध झाले असते, असा स्फोटक दावाही केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये मोठा लष्करी संघर्ष झाला. भारताने पाकिस्तानच्या काही हवाई दलाच्या तळांनाही लक्ष्य केले. हा संघर्ष वाढण्याची चिन्हे असतानाच अचानक राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक शस्त्रसंधी झाल्याची घोषणा केली होती. हा संघर्ष थांबवण्याचे श्रेय सातत्याने ट्रम्प घेत असून, पुन्हा एकदा त्यांनी तसाच दावा केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नाटोचे महासचिव मार्क रट यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत ट्रम्प म्हणाले, 'भारत आणि पाकिस्तान हे ज्या पद्धतीने पुढे पुढे चालले होते ते तसेच सुरू राहिले असते, तर आणखी एका आठवड्यामध्ये त्यांच्यामध्ये अण्वस्त्र युद्धाचा भडका उडाला असता.'
ट्रम्प म्हणाले, 'मी त्यांना (भारत आणि पाकिस्तान) म्हणालो की, जोपर्यंत तुम्ही हा मुद्दा सोडवत नाही, तोपर्यंत आम्ही तुमच्याशी व्यापाराबद्दल चर्चा करणार नाही. त्यामुळे त्यांनी संघर्ष थांबवला.'
डोनाल्ड ट्रम्प भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष थांबल्यापासून हा दावा करत आहे की, व्यापार बंद करण्याची धमकी देऊन ही शस्त्रसंधी घडवून आणली. दुसरीकडे भारत वारंवार हा दावा फेटाळत आला आहे.
संघर्ष सुरू असतानाच ट्रम्प यांनी केली होती शस्त्रसंधीची घोषणा
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लष्करी संघर्ष वाढलेला असतानाच १० मे रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्याची घोषणा केली होती. अमेरिकेच्या मध्यस्थीने दोन्ही देशात शस्त्रसंधी झाल्याचे त्यांनी म्हटले होते.