...अन्यथा दोन्ही देशांवर दबाव वाढवणार; रशिया-युक्रेन युद्धबंदीस अमेरिकेची नवी डेडलाईन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 07:58 IST2026-02-08T07:57:17+5:302026-02-08T07:58:00+5:30
उन्हाळ्यापूर्वी दोन्ही देशांनी करार करून एका ठोस तोडग्यापर्यंत पोहचावे, असे अमेरिकेचे मत आहे

...अन्यथा दोन्ही देशांवर दबाव वाढवणार; रशिया-युक्रेन युद्धबंदीस अमेरिकेची नवी डेडलाईन
किव्ह (युक्रेन) - अमेरिकेने चार वर्षापासून सुरू असलेले रशिया-युक्रेन थांबवण्याच्या दृष्टीने करावयाच्या करारासाठी जूनपर्यंतची मुदत दिली असल्याचे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. ही मुदत पाळली गेली नाही, तर ट्रम्प प्रशासन दोन्ही देशांवर दबाव वाढवेल, असेही झेलेन्स्की यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
उन्हाळ्यापूर्वी युद्ध थांबवण्याचे प्रयत्न
उन्हाळ्यापूर्वी दोन्ही देशांनी करार करून एका ठोस तोडग्यापर्यंत पोहचावे, असे अमेरिकेचे मत आहे. यासाठी एका ठोस भूमिकेवर सहमती व्हायला हवी, असे अमेरिकेला वाटते. असे घडले नाही, तर दोन्ही देशांवर अमेरिका दबाव वाढवेल, असे झेलेन्स्की म्हणाले.
रशियाचा पुन्हा ड्रोन हल्ला
शुक्रवारी रात्री रशियाने सुमारे ४०० ड्रोन आणि ४० क्षेपणास्त्रांनी युक्रेनवर हल्ला केला. यापैकी २९७ ड्रोन पाडण्यात आल्याचे युक्रेनने म्हटले आहे. यात ८ लोक जखमी झाले. १८ इमारर्तीचे नुकसान झाले. यात श्वानांसाठी असलेले एक निवारागृह नष्ट झाले. यात १३ श्वानांचा मृत्यू झाला.
नरेंद्र मोदी यांनी आण्विक हल्ला थांबवला
रशिया युक्रेनवर आण्विक हल्ला करण्याच्या तयारीत होता. परंतु, भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि आण्विक हल्ला थांबवला, असा दावा पोलंडचे परराष्ट्र उपमंत्री व्लादिस्लाव बार्टोशेव्स्की यांनी केला आहे. २०२२च्या अखेरीस रशियाने अशा हल्ल्याची पूर्ण तयारी केली होती. परंतु, पंतप्रधान मोदी यांच्यामुळे जागतिक आण्विक युद्ध टळल्याचा दावा व्लादिस्लाव यांनी केला. भारताची ही सकारात्मक भूमिका आगामी काळातही कायम राहील, असे ते म्हणाले.