उस्मान हादी हत्या प्रकरणात बांगलादेश तोंडघशी पडला; मारेकरी भारतात नाही तर दुबईत सापडला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 10:27 IST2025-12-31T10:27:31+5:302025-12-31T10:27:53+5:30
Osman Hadi Murder Case: बांगलादेशात विद्यार्थी आंदोलकांचा नेता, भारतविरोधी उस्मान हादी याची हत्या झाली होती. बांगलादेशमध्ये भारतानेच हे कृत्य केल्याचे आरोप होत होते.

उस्मान हादी हत्या प्रकरणात बांगलादेश तोंडघशी पडला; मारेकरी भारतात नाही तर दुबईत सापडला...
बांगलादेशात विद्यार्थी आंदोलकांचा नेता, भारतविरोधी उस्मान हादी याची हत्या झाली होती. त्याच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली होती. बांगलादेशमध्ये
भारतानेच हे कृत्य केल्याचे आरोप होत होते. यावरून हिंदू लोकांना टार्गेट करत हिंसाचार सुरु होता. बांगलादेश सरकारही हादीचे मारेकरी भारतात पळून गेल्याचा दावा करत होते. परंतू, या संशयित मारेकऱ्याने दुबईतून व्हिडीओ पोस्ट करून बांगलादेशला तोंडघशी पाडले आहे.
हादी हत्याकांडातील मुख्य संशयित आरोपी फैसल करीम मसूद याने दुबईतून मौन सोडले आहे. या हत्याकांडाशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा करत त्याने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पोलीस तपासात मसूदचे नाव मुख्य सूत्रधार म्हणून समोर आल्यानंतर तो दुबईत असल्याचे समोर आले आहे. काही आठवड्यांपूर्वी उस्मान हादीची हत्या करण्यात आली होती. भारताचा यामागे हात असल्याचे आरोप पाकिस्तान आणि चीनच्या वळचणीला लागलेल्या बांगलादेशने सुरु केले होते. तपास यंत्रणांनी देखील फैसल करीम मसूद आणि त्याच्या एका साथीदाराला भारताच्या सीमेवरून दोन भारतीयांनी रिसिव्ह केल्याचा आरोप केला होता. परंतू, भारताने अशी कोणतीही घटना भारतीय सीमेवर घडल्याचे किंवा पाहिले गेल्याचे आपल्या निदर्शनास आली नसल्याचे स्पष्ट केले होते.
आरोपीचा दावा काय?
मसूदने म्हटले आहे की, "माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. उस्मान हादी याच्या हत्येशी किंवा त्या कटाशी माझा कोणताही संबंध नाही. मला या प्रकरणात विनाकारण गोवण्यात येत आहे." तो पुढे म्हणाला की, तो कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाण्यास तयार आहे, परंतु त्याला चुकीच्या पद्धतीने लक्ष्य केले जात आहे. हादी आणि माझे व्यावसायिक संबंध होते, असेही त्याने स्पष्ट केले आहे.
तपास यंत्रणांची भूमिका
तपास यंत्रणांनी मसूदच्या दाव्यावर संशय व्यक्त केला आहे. त्यांच्याकडे मसूदच्या विरोधात भक्कम पुरावे आणि तांत्रिक माहिती असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मसूदला भारतातून किंवा संबंधित देशातून परत आणण्यासाठी प्रत्यार्पण प्रक्रियेवर काम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.