दहा लाख भारतीयांना संधी; युद्धामुळे रशियातील मनुष्यबळ घटले, उद्योगांमध्ये काम करायला कोणी मिळेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 05:46 IST2025-07-15T05:46:29+5:302025-07-15T05:46:40+5:30
मनुष्यबळासाठी विविध देशांमध्ये तरुणांचा शोध

दहा लाख भारतीयांना संधी; युद्धामुळे रशियातील मनुष्यबळ घटले, उद्योगांमध्ये काम करायला कोणी मिळेना
मॉस्को : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे रशियातील मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर सीमेवर लढत आहे. त्यामुळे येथे उद्योग क्षेत्रात काम करण्यासाठी कामगारांची टंचाई जाणवत आहे. ही टंचाई भरून काढण्यासाठी रशिया येत्या डिसेंबर २०२५ पर्यंत भारतातून तब्बल दहा लाख कामगारांना नेणार असल्याचे माहिती येथील एका व्यावसायिक नेत्याने दिली. त्यामुळे भारतीयांना तरुणांना परदेशात अधिक पगारात काम करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे.
माझ्या माहितीनुसार, या वर्षाअखेरीस भारतातून सुमारे दहा लाख कुशल कामगार रशियामध्ये येणार आहेत. यात स्वेर्दलोव्स्क प्रदेशाचाही समावेश आहे. येकातेरिनबर्ग शहरात नवीन वाणिज्यदूतावास उघडण्यात येणार असून, तो याप्रक्रियेशी संबंधित कामकाज पाहणार आहे, असे उरल चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे प्रमुख आंद्रे बेसेदीन यांनी सांगितले.
कमतरता का आहे?
युद्धासाठी काही कामगार युक्रेनमध्ये पाठवले गेले आहेत आणि तरुण पिढी कारखान्यांमध्ये काम करण्यास अनिच्छुक आहे. त्यामुळे उत्पादन वाढवण्यासाठी कुशल कामगारांची नितांत आवश्यकता आहे, असे
बेसेदिन यांनी सांगितले.
४,००० भारतीयांनी सध्या रशियामध्ये नोकरीसाठी अर्ज केला आहे.
श्रीलंका, उत्तर कोरियातूनही कामगारांना घेऊन जाणार?
रशिया भारताशिवाय श्रीलंका आणि उत्तर कोरियामधूनही कामगार आमंत्रित करण्याचा विचार करत आहे, पण ही प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची असल्याचे बेसेदीन यांनी स्पष्ट केले.
२०२४
पासूनच भारतीय कामगार रशियातील विविध भागांतील उद्योगांमध्ये काम करतआहेत. कलिनिनग्राडमधील ‘झा रोडिनू’ मासे प्रक्रिया उद्योगाने विशेषतः भारतीय कामगारांना आमंत्रित केले.
रशियाला किती कामगार हवेत? : रशियाच्या श्रम मंत्रालयाने अंदाज वर्तवला आहे की २०३० पर्यंत देशात सुमारे ३१ लाख कामगारांची कमतरता जाणवेल. यामुळे २०२५ साली परदेशी कुशल कामगारांच्या कोट्यात १.५ पट वाढ करून २.३ लाखांपर्यंत नेण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.