अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारत-पाकिस्तानचे युद्ध थांबविल्याचा दावा करत सुटले आहेत. तर भारत हा दावा फेटाळत आहे, युद्धाचा मुद्दा दोन देशांनीच सोडविला असल्याचे भारताने म्हटले आहे, यात तिसऱ्या पक्षाचा संबंध नाही, असे स्पष्ट केले आहे. आता व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव यांनी कतारमध्ये काम करणाऱ्या काश्मीरी वेटरची कहानी पोस्ट करत ट्रम्पनी कसे युद्ध थांबविले, ते कसे जगातील संकटांचा सामना करत आहेत हे सांगितले आहे.
ट्रम्प सध्या अरब राष्ट्रांच्या दौऱ्यावर आहेत. कतारच्या दौऱ्यावेळी त्यांच्यासोबत व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेविट देखील होत्या. हॉटेलमध्ये सकाळी त्या नाश्ता करत होत्या, तेव्हा एक वेटर त्यांच्याजवळ आला आणि त्याने म्हणे त्यांना ट्रम्पना थँक्यू सांगा, असे म्हटले. हा वेटर लेविट यांना ओळखत होता व त्या काय काम करतात हे त्याला माहिती होते.
लेविट यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, एका वेटरने ट्रम्पचे का आभार मानले असे वाटल्याने मी त्याला का असे विचारले. तेव्हा त्याने सांगितले की, तो काश्मीरचा आहे. भारत-पाकिस्तान मधील युद्धामुळे काश्मीरला परतू शकत नाही. परंतू, आता ट्रम्पनी युद्ध थांबविल्याने तो काश्मीरला जाऊ शकतो. त्या वेटरने ट्रम्पना यासाठी पुरेसे श्रेय दिले जात नाही हे देखील मान्य केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे दक्षिण आशियात अणुयुद्ध होता होता राहिले, असे तो म्हणाल्याचे केविट यांनी म्हटले आहे.
यानंतर लेविट यांनी पुन्हा ट्वीट करून त्या वेटरला आता काश्मीरला जायला मिळेल, असे सांगण्यात आल्याचे म्हटले आहे. तसेच त्या पुढे म्हणाल्या की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना जगभरातील अनेक संघर्ष वारशाने मिळाले आहेत. जे ते एकामागोमाग एक सोडवत आहेत. मध्य पूर्वेतील हा ऐतिहासिक दौरा या प्रदेशातील अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात एक महत्त्वाचा टप्पा आहे जो अखेर मध्य पूर्वेसाठी सुवर्णयुगाची सुरुवात करेल. शक्तीच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित केली जात आहे, असे त्यांनी म्हटले.