भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले केल्यानंतर तटस्थ प्रतिक्रिया देणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी मध्यस्थीची ऑफर दिली आहे. दोन्ही देशांसोबत आमचे चांगले संबंध आहेत. जर मी यामध्ये काही करू शकत असेन तर नक्कीच मी तिथे असेन असे त्यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांनी यापूर्वीही पाकिस्तानसोबत समेट घडवून आणण्याची भारताला ऑफर दिली होती. परंतू, भारताने ती फेटाळली होती. आता पुन्हा एकदा ट्रम्प यांना मध्यस्थी करावीशी वाटत आहे. माझे दोघांशीही चांगले जमते. मी दोघांनाही चांगले ओळखतो. आशा आहे की ते आता ते थांबवू शकतील. त्यांनी जशास तसे केले आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
यापूर्वी भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्याचे समजताच बुधवारी पहाटे डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया आली होती. "हे लाजिरवाणे आहे. ओव्हलच्या दारातून चालत असताना आम्हाला याबद्दल कळले. मला वाटते की भूतकाळातील घटनेवरून लोकांना काहीतरी घडणार आहे हे माहित होते. ते खूप काळापासून लढत आहेत. जर तुम्ही विचार केला तर ते अनेक, अनेक दशके आणि शतके लढत आहेत. मला आशा आहे की ते खूप लवकर संपेल.", असे ट्रम्प यांनी म्हटले होते.
पाकिस्तानवरील हल्ल्यानंतर भारताने अमेरिकेला अधिकृतपणे याबद्दल माहिती दिली होती. भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी म्हटले होते.