भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 09:46 IST2025-05-08T07:37:35+5:302025-05-08T09:46:46+5:30

भारताने केलेल्या हल्ल्यात ३१ लोकांचा मृत्यू झाला असून ५७ जण जखमी आहेत. हल्ल्यानंतर पाकिस्तानातील विमान सेवा खंडीत करण्यात आली आहे. 

Operation Sindoor: India attacked with 80 fighter jets; Pakistani Prime Minister Shahbaj Shariff Claim | भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा

भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारतानेऑपरेशन सिंदूर हाती घेतले. यात भारतानेपाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील ९ दहशतवादी तळांना टार्गेट केले. हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद, लश्कर ए तय्यबा या संघटनेचे ९० हून अधिक दहशतवादी ठार झाले. भारताच्या या स्ट्राईकनंतर पाकिस्तानात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. त्यात पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी कांगावा करण्यास सुरुवात केली आहे. भारताच्या ८० लढाऊ विमानांनी हा हल्ला केला असं शरीफ यांनी म्हटलं.

जनतेला संबोधित करताना पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ म्हणाले की, भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानी सैन्य तयार आहे. मंगळवारी रात्री झालेल्या हल्ल्यात भारताचे ८० लढाऊ विमान सहभागी होते. भारताच्या या हल्ल्याबाबत आम्हाला आधीच गुप्तचर यंत्रणेने माहिती दिली होती. आमचे सशस्त्र दल २४ तास हायअलर्टवर होते. मातृभूमीच्या रक्षणासाठी आम्ही तयार आहोत. पहलगाम हल्ल्याची पारदर्शक चौकशी करण्याची आमची मागणी आहे असं त्यांनी म्हटलं.

तर भारताच्या हल्ल्यानंतरही पाकिस्तानने संयम बाळगला आहे असं विधान उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी केले. शहबाज शरीफ यांनी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक घेतली. त्यात कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री आणि सर्व सैन्य दलाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पाकिस्तानी सैन्याला कारवाईसाठी मुभा दिली आहे. भारताने केलेल्या हल्ल्यात ३१ लोकांचा मृत्यू झाला असून ५७ जण जखमी आहेत. हल्ल्यानंतर पाकिस्तानातील विमान सेवा खंडीत करण्यात आली आहे. 

भारताच्या एअर स्ट्राईकनं पाकिस्तान घाबरला

नेहमीप्रमाणे आताही पाकिस्तानने त्यांच्या हद्दीत दहशतवादी सेंटर नसल्याचा दावा केला. पहलगाम हल्ल्याची जागतिक तपास यंत्रणेकडून चौकशी व्हावी अशी मागणी पाकिस्तानने केली. आम्हाला शांतता हवी असं विधान भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने दिले. भारताच्या सैन्य कारवाईनंतर काही तासांत पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी जर भारताने नरमाईची भूमिका घेतली तर दोन्ही देशातील तणाव कमी करण्यास आम्ही तयार आहोत असं विधान केले आहे.
 

Web Title: Operation Sindoor: India attacked with 80 fighter jets; Pakistani Prime Minister Shahbaj Shariff Claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.