घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 19:36 IST2025-05-08T19:35:00+5:302025-05-08T19:36:33+5:30
Operation Sindoor: भारताच्या तुफानी कारवाईमुळे हबकलेल्या पाकिसानला आता अल कायदा ह्या कुख्यात दहशतवादी संघटनेची साथ मिळाली आहे. तसेच अल कायदाने या कारवाईविरोधात भारतामध्ये ‘जिहाद फी सबीलिल्लाह’ करण्याची धमकी दिली आहे.

घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी
पुलवामा हल्ल्याचा बदला म्हणून भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानची सुरक्षा यंत्रणा पुरती घायाळ झाली आहे. सुरुवातीला पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केल्यानंतर भारताने आज पाकिस्तानची हवाई सुरक्षा यंत्रणा आणि रडार प्रणाली नष्ट केली. भारताच्या तुफानी कारवाईमुळे हबकलेल्या पाकिसानला आता अल कायदा ह्या कुख्यात दहशतवादी संघटनेची साथ मिळाली आहे. तसेच अल कायदाने या कारवाईविरोधात भारतामध्ये ‘जिहाद फी सबीलिल्लाह’ करण्याची धमकी दिली आहे. अल कायदाच्या अल कायदा इन द इंडियन सबकॉन्टिनन्टने ही धमकी दिली आहे.
या संघटनेने सांगितले की, भारत दीर्घकाळापासून इस्लामविरोधात युद्ध करत आहे. हल्लीच झालेला हल्ला हा त्याचाच एक भाग आहे. अल कायदा इन द इंडियन सबकॉन्टिनन्टने याबाबत पुढे सांगितले की भारतीय उपखंडामधील सर्व मुजाहिद्दीन आणि मुस्लिमांसाठी भारताविरोधात हे युद्ध जिहाद फी सबीलिल्लाह आहे. अल्लाची शिकवण पुढे नेण्यासाठी आणि इस्लाम व मुस्लिमांना वाचवण्यासाठी आणि उपखंडातील शोषितांचं रक्षण करण्यासाठी हे युद्ध जिहाद फी सबीलिल्लाह आहे.
भारताने अनेक गुन्हे केले आहेत. भारताकडून हे कृत्य अनेक दशकांपासून सुरू आहे, असा दावाही या संघटनेने केला. दरम्यान, जिहाद फी सबीलिल्लाह याचा अर्थ अल्लाहच्या मार्गावरील संघर्ष असा होतो. अल कायदा आणि आयएसआयएससारख्या संघटना या शब्दाचा वापर आपल्या कारवायांचं समर्थन करण्यासाठी करत असतात. ते हिंसेला आणि दहशतवादाला समर्थन देण्यासाठी याचा वापर करतात.