बुधवारी पहाटे भारतीय सैन्याने पाकिस्तानवर जोरदार प्रहार केला आहे. यामुळे दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानचा तीळपापड झाला असून पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी त्यांच्या देशाला रात्री उशिरा संबोधित केले आहे. पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी हवाई दलाच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली, दुसरीकडे शाहबाज शरीफ यांनी भारताने सांडलेल्या रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेणार असल्याची धमकी शरीफ यांनी दिली आहे.
भारताने गेल्या रात्री जी चूक केली त्याची मोठी किंमत त्यांना मोजावी लागेल. आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढू. पाकिस्तानने भारताला जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे, काही तासांतच आम्ही त्यांना मागे ढकलले आहे. भारताने केलेल्या हल्ल्यात २६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, यात महिला आणि मुलांचा समावेश आहे. ४० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या शहीदांच्या पाठीशी पाकिस्तान उभा आहे, असे शरीफ म्हणाले. भारताला रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत चुकवावी लागेल, अशी धमकीही त्यांनी दिली.
संसदेत काय म्हणालेले...
काल रात्री भारत पूर्ण तयारीने आला होता. ८० लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या ६ जागांवर हल्ला केला. रात्री आम्हाला याची माहिती मिळत होती. काल रात्री आमच्या 'शत्रूने' रात्रीच्या अंधारात आमच्यावर हल्ला केला, परंतु अल्लाहच्या आशीर्वादाने आमचे सैन्य त्यांना योग्य उत्तर देऊ शकले. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये एक दुर्दैवी घटना घडली, भारताने घाईघाईने कारवाई केली आणि भारतीय माध्यमांनी पाकिस्तानवर निराधार आरोप करायला सुरुवात केली, असे शाहबाज यांनी संसदेत कबुली देताना म्हटले आहे.
पहलगाम हल्ल्याची बातमी मिळाली तेव्हा मी स्वतः तुर्कीच्या दौऱ्यावर होतो. आम्ही तेव्हाच स्पष्ट केले होते की या हल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत असे सांगितले होते, परंतु भारताने आमची ऑफर स्वीकारली नाही, असाही आरोप शाहबाज यांनी केला होता.