"पैसे द्या नाहीतर किडनी विकू"; अझरबैजानमध्ये भारतीय तरुणांचे अपहरण, परराष्ट्र मंत्रालयाने दोघांना वाचवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 15:34 IST2026-02-12T15:26:58+5:302026-02-12T15:34:27+5:30

अमेरिकेत चोरट्या मार्गाने जाण्याच्या नादात गुजरातमधील दोघांचे अपहरण झाल्याची घटना समोर आली.

Operation Mahisagar Indian Govt Rescues Two Gujarati Youths from Kidnappers in Azerbaijan | "पैसे द्या नाहीतर किडनी विकू"; अझरबैजानमध्ये भारतीय तरुणांचे अपहरण, परराष्ट्र मंत्रालयाने दोघांना वाचवलं

"पैसे द्या नाहीतर किडनी विकू"; अझरबैजानमध्ये भारतीय तरुणांचे अपहरण, परराष्ट्र मंत्रालयाने दोघांना वाचवलं

America Donkey Route: अमेरिकेत स्थायिक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अवैध मार्गाने प्रवास करणाऱ्या गुजरातमधील दोन तरुणांना अझरबैजानमध्ये भीषण संकटाचा सामना करावा लागला. ध्रुव पटेल (२२) आणि दीपिका पटेल (३२) या दोन तरुणांचे अपहरण करून त्यांना रक्ताळलेल्या अवस्थेत डांबून ठेवण्यात आले होते. अखेर भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्या हस्तक्षेपामुळे आणि भारतीय दूतावासाच्या ऑपरेशन महिसागरमुळे या दोघांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

प्रवास कसा सुरू झाला?

गुजरातच्या आणंद जिल्ह्यातील कंथरिया येथील ध्रुव आणि दीपिका यांनी अमेरिकेला जाण्यासाठी मुंबईतील एका एजंटशी संपर्क साधला होता. या एजंटने त्यांना डंकी रूट म्हणजेच अवैध मार्गाने अमेरिकेत नेण्याचे आश्वासन दिले. ध्रुवने या प्रवासासाठी ३५ लाख रुपये, तर दीपिकाने १५ लाख रुपये एजंटला दिले होते.
३० जानेवारीला त्यांनी आपला प्रवास सुरू केला आणि १ फेब्रुवारीला ते अझरबैजानची राजधानी बाकू येथे पोहोचले. तिथे पोहोचताच एजंटने त्यांचे मोबाईल बंद करण्यास सांगितले.

अझरबैजानमध्ये काय घडले? 

बाकूमध्ये पोहोचल्यानंतर पवन नावाच्या एका एजंटने त्यांच्याकडे आणखी पैशांची मागणी केली. तरुणांनी पैसे देण्यास नकार दिला असता, त्यांचे अपहरण करून त्यांना एका निर्जन घरातील तळघरात डांबून ठेवण्यात आले. अपहरणकर्त्यांनी ध्रुवला बेदम मारहाण केली. धक्कादायक म्हणजे, त्याच्या कुटुंबीयांना व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलवर हा छळ दाखवण्यात आला. पैसे दिले नाहीत तर ध्रुवची किडनी काढून विकू, अशीही धमकी अपहरणकर्त्यांनी दिली.

घाबरलेल्या कुटुंबीयांनी कसेबसे ६५ लाख रुपये जमवले आणि त्यातील निम्मी रक्कम क्रिप्टोकरन्सीद्वारे दिली. मात्र, पैसे घेऊनही अपहरणकर्त्यांनी त्यांना सोडले नाही आणि अजून पैशांची मागणी केली.

कसे झाले ऑपरेशन महिसागर?

आणखी काही पर्याय उरला नसल्याने कुटुंबीयांनी आणंदचे खासदार मितेश पटेल यांची भेट घेतली. खासदारांनी तात्काळ दिल्लीत एस. जयशंकर यांची भेट घेऊन या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली. त्यानंतर भारतीय दूतावासाने अझरबैजान सरकारवर राजनैतिक दबाव आणला. भारतीय अधिकाऱ्यांनी ऑपरेशन महिसागर सुरू केले आणि अवघ्या २४ तासांच्या आत त्या घराचा शोध घेतला. एका धाडसी मोहिमेत दोघांचीही अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरूप सुटका करण्यात आली.

सध्या ध्रुव आणि दीपिका अझरबैजानमधील भारतीय दूतावासाच्या संरक्षणाखाली असून त्यांना भारतात परत आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. खासदार मितेश पटेल यांनी या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली असून, तरुणांनी अशा शॉर्टकटच्या आणि बेकायदेशीर मार्गांच्या आहारी जाऊ नये, असे आवाहन केले आहे.

Web Title : अज़रबैजान में भारतीय युवाओं का अपहरण, मंत्रालय के हस्तक्षेप के बाद बचाया गया।

Web Summary : अमेरिका का सपना देख रहे दो गुजराती अज़रबैजान में किडनैप हो गए। फिरौती की धमकी के बाद भारतीय दूतावास के हस्तक्षेप पर उन्हें बचाया गया। विदेश मंत्रालय के हस्तक्षेप और 'ऑपरेशन महिसागर' ने उनकी सुरक्षित वापसी सुनिश्चित की। पीड़ितों को अवैध रास्तों से अमेरिका ले जाया गया।

Web Title : Indian youth kidnapped in Azerbaijan, rescued after ministry intervention.

Web Summary : Two Gujaratis, dreaming of America, were kidnapped in Azerbaijan. They were rescued after the Indian embassy intervened following threats for ransom. The External Affairs Minister's intervention and 'Operation Mahisagar' ensured their safe return. Victims were lured via illegal routes to US.