बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 12:43 IST2025-11-06T12:41:53+5:302025-11-06T12:43:26+5:30
बांगलादेशातील सामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघरातील कांद्याच्या किंमतीने सध्या अक्षरशः आग लावली आहे.

बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
बांगलादेशातील सामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघरातील कांद्याच्या किंमतीने सध्या अक्षरशः आग लावली आहे. अवघ्या काही दिवसांत कांद्याचे दर दुप्पट झाले असून, सर्वसामान्य लोकांचे महिन्याचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. राजधानी ढाकासह चितगाव, राजशाही आणि खुलना यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये कांदा ११० ते १२० टका प्रति किलो दराने विकला जात आहे. काही दिवसांपूर्वी याच कांद्याचा भाव ६० टका प्रति किलो होता, त्यामुळे ही दरवाढ नागरिकांसाठी मोठा धक्का आहे.
भारताच्या निर्यातीवरील बंदीचा थेट परिणाम
बांगलादेशात कांद्याचे दर इतके वाढण्यामागे भारताने निर्यात थांबवणे हे सर्वात मोठे कारण आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बांगलादेशातील कांद्याचा सध्याचा साठा जवळपास संपुष्टात आला आहे. याच वेळी, भारताने देशांतर्गत किमती नियंत्रित ठेवण्यासाठी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली. याचा थेट आणि मोठा परिणाम बांगलादेशातील बाजारांवर झाला आहे.
"भारतातून कांद्याची आयात पुन्हा सुरू होत नाही, तोपर्यंत किंवा बांगलादेशातील नवीन पीक बाजारात येत नाही, तोपर्यंत कांद्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे," असे चितगाव आणि राजशाही येथील आयातदारांचे म्हणणे आहे.
व्यापाऱ्यांकडून कृत्रिम तुटवड्याचा खेळ?
कंझ्युमर असोसिएशन ऑफ बांगलादेश या ग्राहक संघटनेने मात्र ही दरवाढ पूर्णपणे अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे. काही व्यापारी कृत्रिमरित्या बाजारात कांद्याची टंचाई दाखवून दर वाढवत असल्याचा गंभीर आरोप संघटनेने केला आहे.
या कृत्रिम टंचाईचा उद्देश लवकर आयातीची परवानगी मिळवणे हा असल्याचा दावाही संघटनेने केला आहे. याचाच अर्थ, काही व्यापाऱ्यांनी साठा दडवून ठेवल्याने बाजारात कांदा दिसत नाही, ज्यामुळे लोकांना जास्त दराने तो खरेदी करावा लागतो.
नवीन पीक येण्यास विलंब, सरकारवर दबाव
यावर्षी बांगलादेशातील रब्बी हंगामातील कांद्याचे पीक तयार होण्यास उशीर होत आहे. दरवर्षी ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत हे पीक बाजारात दाखल होते, पण यावर्षी ते अजून झालेले नाही. आयातदार आणि व्यापाऱ्यांचे मत आहे की, सरकारने तातडीने आयातीची परवानगी दिल्यास दुसऱ्याच दिवशी बाजारातील परिस्थिती नियंत्रणात येऊ शकते आणि लोकांना दिलासा मिळू शकतो.
तज्ज्ञांच्या मते, या समस्येवर तात्काळ तोडगा काढण्यासाठी सरकारने बाजारावर कठोर नजर ठेवणे आणि गरजेनुसार वेळेवर आयातीचा निर्णय घेणे आवश्यक आहे. केवळ आयात सुरू करणे हा एकमेव उपाय नाही, तर साठेबाजी थांबवण्यासाठी कडक पाऊले उचलणे गरजेचे आहे. कांद्यामुळे सर्वसामान्यांचे डोळे पाणावलेले असताना, आता बांगलादेश सरकार यावर काय उपाययोजना करते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.