शाहरुख खानला ओळखतो का? सुदानमध्ये भारतीय तरुणाचे अपहण, बंदूक दाखवून द्यायला लावल्या घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 15:01 IST2025-11-04T15:00:49+5:302025-11-04T15:01:15+5:30
सुदानमध्ये सुरू असलेल्या संघर्षादरम्यान, एका भारतीय नागरिकाचे रॅपिड सपोर्ट फोर्सने अपहरण केले आहे.

शाहरुख खानला ओळखतो का? सुदानमध्ये भारतीय तरुणाचे अपहण, बंदूक दाखवून द्यायला लावल्या घोषणा
Odisha Youth Kidnapped in Sudan: रोजगारासाठी मायदेशापासून हजारो किलोमीटर दूर गेलेल्या ओडिशातील एक तरुण आज युद्धग्रस्त सुदानमध्ये सर्वात भयानक परिस्थितीला तोंड देत आहे. सुदानमध्ये, आरएसएफ म्हणजेच रॅपिड सपोर्ट फोर्सेस मिलिशियाने एका भारतीय नागरिकाचे अपहरण केले आहे. जगतसिंहपूर जिल्ह्याचे रहिवासी असलेले ३६ वर्षीय आदर्श बेहरा सध्या सुदानी बंडखोर गट रॅपिड सपोर्ट फोर्सेसच्या लढवय्यांच्या ताब्यात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे आदर्शचे अपहरण झाल्याचे उघड झालं.
आदर्श बेहरा हे २०२२ पासून सुदानमधील 'सुकाराती प्लास्टिक फॅक्टरी'त काम करत होते. आदर्श सुदानमधील खार्तूमपासून सुमारे १,००० किलोमीटर दूर असलेल्या अल फाशिर शहरातून बेपत्ता झाले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आरएसएफचे बंडखोर आदर्श बेहरा यांना बंदुकीच्या धाकावर घेरून उभे असलेले दिसत आहेत. हे बंडखोर त्यांना कमांडर मोहम्मद हमदान दागालो यांच्या समर्थनार्थ घोषणा द्यायला लावत आहेत. सर्वात धक्कादायक म्हणजे, दहशत निर्माण करण्यासाठी ते बंडखोर तू शाहरुख खानला ओळखतो का? असेही विचारत आहेत.
आदर्श बेहरा यांचे कुटुंब, त्यांची पत्नी सुस्मिता आणि त्यांची लहान मुले ओडिशा सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाकडे मदतीची याचना करत आहेत. आणखी एका व्हिडीओमध्ये आदर्श जमिनीवर हात जोडून बसलेले दिसत आहेत. "मी अल फाशिरमध्ये आहे, येथील परिस्थिती खूप वाईट आहे. मी दोन वर्षांपासून इथे मोठ्या अडचणीत जगत आहे. माझा परिवार आणि मुले खूप चिंतेत आहेत. मी राज्य सरकारला (ओडिशा) मला येथून बाहेर काढण्याची विनंती करतो," असे आदर्श बेहरा म्हणताना दिसत आहेत.
सुदानमधील भारताचे राजदूत आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी आदर्श बेहरा यांच्या अपहरणाची पुष्टी केली आहे. भारतात असलेले सुदानचे राजदूत मोहम्मद अब्दुल्ला अली एल्टॉम यांनी स्पष्ट केले की, आदर्श यांच्या सुटकेसाठी सूडानी अधिकारी आणि भारतीय परराष्ट्र मंत्रालय एकत्रितपणे काम करत आहेत. "आम्ही त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुटकेसाठी प्रयत्नशील आहोत. मात्र अल फाशिरची परिस्थिती अत्यंत अस्थिर आहे," असे एल्टॉम यांनी सांगितले. त्यांनी भारताने युद्धकाळात केलेली वैद्यकीय आणि अन्नधान्याची मदत महत्त्वाची असल्याचे म्हटले.
सुदान का जळत आहे?
एप्रिल २०२३ पासून सुदानमध्ये लष्करी गट आणि बंडखोर आरएसएफ यांच्यात सत्तासंघर्षामुळे गृहयुद्ध पेटले आहे. या विनाशकारी संघर्षाने १.३ कोटींहून अधिक लोकांना विस्थापित केले आहे. अल फाशिर, जिथे आदर्श अडकले आहेत, ते शहर नुकतेच बंडखोरांच्या ताब्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाने आरएसएफच्या कृत्यांना युद्ध गुन्हे ठरवले आहे. रॅपिड सपोर्ट फोर्सेसवर यापूर्वी परदेशी नागरिकांना प्रचाराचे साधन म्हणून वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की आदर्शला केवळ पैशासाठीच नव्हे तर भारतावर दबाव आणण्यासाठी आणि मीडियाचे लक्ष वेधण्यासाठी देखील पकडण्यात आले असावे.