Nuclear Weapon : ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचं नुकसान झालं? पाकचं परराष्ट्र मंत्रालय म्हणतंय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 13:31 IST2025-05-24T13:29:24+5:302025-05-24T13:31:53+5:30
भारताच्या कारवाईत पाकिस्तानच्या अणु पायाभूत सुविधांनाही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. या दाव्यांवर प्रतिक्रिया देताना पाकिस्तानने शुक्रवारी आपली बाजू मांडली.

Nuclear Weapon : ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचं नुकसान झालं? पाकचं परराष्ट्र मंत्रालय म्हणतंय...
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ करत कठोर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत पाकिस्तानात असलेल्या १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून, १३ पैकी ११ एअरबेसना लक्ष्य करण्यात आले होते. यासह ९ दहशतवादी तळं उद्ध्वस्त करण्यात आली. याच दरम्यान पाकिस्तानच्या किराणा हिल्सवर स्थित अण्वस्त्रांना ही हादरा बसल्याचे बोलले जात होते. यावर आता पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आहे.
सोशल मीडियावर काही दावे करण्यात होते की, भारताच्या कारवाईत पाकिस्तानच्या अणु पायाभूत सुविधांनाही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. या दाव्यांवर प्रतिक्रिया देताना पाकिस्तानने शुक्रवारी आपली बाजू मांडली.
पाकिस्तानची उलट बोंब
पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने म्हटले की, “आमच्या अण्वस्त्रांची सुरक्षा, कमांड आणि कंट्रोल स्ट्रक्चर अत्यंत सक्षम आणि सुरक्षित आहे. आमच्या अणु धोरणाबाबत आम्हाला पूर्ण विश्वास आहे.”
पण त्याच वेळी, पाकिस्तानने भारताच्या अणु धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी असा आरोप केला की, भारतातील राजकीय वातावरण, प्रसारमाध्यमे आणि काही सामाजिक घटकांमधील वाढता कट्टरतावाद हा अणु सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतो.
आता चर्चा फक्त पीओकेवर!
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यावर ठाम भूमिका घेतली. श्रीनगरमध्ये बोलताना त्यांनी स्पष्ट सांगितले की, पाकिस्तानची अण्वस्त्रे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (IAEA) देखरेखीखाली आणली गेली पाहिजेत. त्यांनी असेही म्हटले की, भारत आता आण्विक ब्लॅकमेलिंगला बळी पडणार नाही आणि सीमापार दहशतवादाला सडेतोड उत्तर देईल.
भारतीय संसद सदस्य सध्या विविध देशांमध्ये जाऊन जागतिक समुदायाला पाकिस्तानचा खरा चेहरा दाखवत आहेत. पाकिस्तान केवळ दहशतवाद्यांना आश्रय देत नाही, तर त्यांना सक्रिय पाठबळही पुरवत आहे. भारताची भूमिका आता स्पष्ट आहे की, पाकिस्तानबरोबर कोणतीही चर्चा होणार असल्यास, ती फक्त पाकव्याप्त काश्मीर या मुद्द्यावरच होईल.