आता १९ नव्हे, 'या' ३० देशांच्या लोकांना अमेरिकेत 'नो एन्ट्री'! डोनाल्ड ट्रम्प कायदे आणखी कठोर करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 12:53 IST2025-12-03T12:50:34+5:302025-12-03T12:53:21+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकरच अमेरिकेतील प्रवेशाचे नियम काही देशांसाठी अधिक कठोर करण्याच्या तयारीत आहेत.

आता १९ नव्हे, 'या' ३० देशांच्या लोकांना अमेरिकेत 'नो एन्ट्री'! डोनाल्ड ट्रम्प कायदे आणखी कठोर करणार
अमेरिकेत ट्रम्प प्रशासनाने 'ट्रॅव्हल बॅन' १९ वरून वाढवून जवळपास ३० देशांपर्यंत विस्तारण्याची तयारी सुरू केली आहे. यूएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसने या देशांतील नागरिकांचे व्हिसा आणि ग्रीन कार्ड अर्ज थांबवण्यास सुरुवात केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इतका कठोर निर्णय का घेतला आणि यात कोणते देश समाविष्ट आहेत, चला जाणून घेऊया.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकरच अमेरिकेतील प्रवेशाचे नियम काही देशांसाठी अधिक कठोर करण्याच्या तयारीत आहेत. ट्रम्प प्रशासन आता आपल्या प्रवास बंदीला अधिक कडक करत १९वरून सुमारे ३० देशांपर्यंत वाढवण्याची योजना आखत आहे. वॉशिंग्टन डी.सी.मध्ये नुकत्याच झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर सुरक्षेच्या वाढलेल्या चिंतेमुळे हा निर्णय घेतला जात आहे.
हा निर्णय घेण्यामागे मुख्य कारण काय?
मागील आठवड्यात वॉशिंग्टनमध्ये दोन नॅशनल गार्ड सदस्यांवर गोळीबार करण्यात आला, ज्यात एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. या हल्ल्याचा आरोपी रहमानुल्लाह लकनवाल हा अफगाणिस्तानचा नागरिक आहे. तो २०२१ मध्ये अमेरिकेत आला होता आणि त्याने अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन सैन्य आणि सीआयएसोबत काम केले होते. ट्रम्प प्रशासनाने या हल्ल्याला स्थलांतर प्रणालीची कमकुवतता म्हणून संबोधले आहे आणि याच कारणामुळे 'बॅन' अधिक कडक करण्याची भूमिका घेतली आहे.
सध्या 'बॅन' अंतर्गत कोणते देश आहेत?
सध्या अमेरिकेने ज्या १२ देशांवर पूर्णपणे प्रवास बंदी घातली आहे, त्यात अफगाणिस्तान, चाड, काँगो, एरिट्रिया, इराण, लिबिया, म्यानमार, सोमालिया, सुदान, येमेन, इक्वेटोरियल गिनी आणि हैती यांचा समावेश आहे. याशिवाय, बुरुंडी, क्युबा, लाओस, सिएरा लिओन, टोगो, तुर्कमेनिस्तान आणि व्हेनेझुएला या देशांवर आंशिक बंदी लागू आहे. अशा प्रकारे सध्या बॅन असलेल्या देशांची संख्या १९ आहे, जी आता वाढवून सुमारे ३० देशांपर्यंत नेली जाण्याची शक्यता आहे.
ग्रीन कार्ड आणि व्हिसावरही निर्बंध
यूएससीआयएसने घोषणा केली आहे की, ज्या १९ देशांवर आधीच बंदी आहे, त्या देशांतील नागरिकांचे ग्रीन कार्ड, व्हिसा आणि इतर स्थलांतर अर्ज तात्पुरते थांबवले जातील. त्याचबरोबर, माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाच्या काळात अमेरिकेत प्रवेश मिळालेल्या अशा लोकांची पुन्हा तपासणी केली जाईल.
ट्रम्प प्रशासनाने यापूर्वीही स्थलांतरासंबंधी अनेक कठोर पाऊले उचलली आहेत, जसे की शरणार्थींच्या संख्येत कपात करणे, अनेक देशांसाठी तात्पुरते संरक्षित दर्जा संपुष्टात आणणे आणि हजारो व्हिसा रद्द करणे. आता पुन्हा एकदा 'ट्रॅव्हल बॅन'चा विस्तार करणे ही ट्रम्प प्रशासनाची प्रमुख प्राथमिकता बनली आहे.