'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 20:36 IST2025-09-21T20:16:43+5:302025-09-21T20:36:47+5:30
अमेरिकेच्या मागणीवर अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिला इशारा

'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
Taliban on Bagram Airbase: चार वर्षांपूर्वी अफगाणिस्तान सोडल्यानंतर अमेरिकेने पुन्हा एकदा नजर वळवली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानला कडक इशारा दिला आहे. जर अफगाणिस्तानने बग्राम हवाई तळ अमेरिकेला परत केला नाही तर तो निर्णय त्यांच्यासाठी खूप वाईट ठरू शकतो अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवजा इशाऱ्यानंतर अफगाणिस्ताननेही चोख प्रत्युत्तर दिलं. अफगाणिस्तान अमेरिकेला एक मीटरही जमीन देणार असा इशारा तालिबानच्या सरकारने दिला.
डोनाल्ड ट्रम्प यांचे अफगाणिस्तानातील बग्राम हवाई तळ ताब्यात घेण्याचे स्वप्न तालिबान उधळून लावत असल्याचे दिसून येत आहे. तालिबान सरकारने स्पष्ट नकार दिल्यानंतर, अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी यांनी ट्रम्प यांच्या विधानाचा तीव्र निषेध केला. 'बग्राम हवाई तळ सोडाच पण आम्ही अमेरिकेला एक मीटरही अफगाणिस्तानची जमीन देणार नाही,' असं मुत्ताकी यांनी म्हटलं. टोलो न्यूजशी बोलताना मुत्ताकी यांनी हे विधान केले आहे.
बग्राम हवाई तळ सध्या तालिबानच्या ताब्यात आहे. २०२१ मध्ये अमेरिका आणि मित्र राष्ट्रांच्या सैन्याने अफगाणिस्तानातून माघार घेतल्यानंतर तालिबानने तो ताब्यात घेतला होता. तालिबानचे मुख्य प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी ट्रम्प यांच्या विधानांना नकार दिला आणि अमेरिकेला वास्तववादी आणि तर्कसंगत धोरण स्वीकारण्याचा सल्ला दिला. अफगाणिस्तानचे परराष्ट्र धोरण अफगाण लोकांच्या आर्थिक हितांवर केंद्रित आहे. द्विपक्षीय चर्चेदरम्यान अफगाणिस्तानचे स्वातंत्र्य आणि प्रादेशिक अखंडता सर्वोपरि आहे हे वारंवार सांगितले गेले आहे, असं जबीहुल्लाह मुजाहिद यांनी म्हटलं.
"इस्लामिक तत्त्वांनुसार अर्थ-केंद्रित परराष्ट्र धोरणानुसार, इस्लामिक अमिराती ऑफ अफगाणिस्तान सर्व राज्यांशी परस्पर आणि सामायिक हितसंबंधांवर आधारित रचनात्मक संबंध ठेवू इच्छित आहे. इस्लामिक अमिरातीसाठी अफगाणिस्तानचे स्वातंत्र्य आणि प्रादेशिक अखंडता अत्यंत महत्त्वाची आहे हे अमेरिकेला सातत्याने कळवले आहे," असेही मुजाहिद यांनी म्हटलं.
या प्रकरणाबाबत, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने शुक्रवारी सांगितले की, चीन अफगाणिस्तानच्या प्रादेशिक अखंडतेचा आणि सार्वभौमत्वाचा आदर करतो आणि अफगाणिस्तानचे भविष्य अफगाण लोकांच्या हातात असले पाहिजे. माध्यमांच्या वृत्तानुसार, सॅटेलाईट इमेजनुसार तालिबानच्या माघारीनंतर या हवाई तळावर फारच कमी हालचाली दिसून आल्या आहेत.