युरोपचा तोरा उतरला! जगातील सर्वात जुन्या कलेचा मान आशियाला; 'या' देशात सापडलं ६७,८०० वर्षं जुनं गुहाचित्र!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 17:37 IST2026-01-22T17:36:22+5:302026-01-22T17:37:51+5:30
सुलावेसी भागातील घनदाट जंगलात एका प्राचीन गुहेत मानवी हाताचा असा एक ठसा सापडला आहे, ज्याने इतिहास बदलण्यास भाग पाडले आहे.

युरोपचा तोरा उतरला! जगातील सर्वात जुन्या कलेचा मान आशियाला; 'या' देशात सापडलं ६७,८०० वर्षं जुनं गुहाचित्र!
मानवी संस्कृती, कला आणि कल्पकता यांचा उगम युरोपमध्ये झाला, हा अनेक दशकांपासूनचा समज आता मोडीत निघाला आहे. इंडोनेशियातील सुलावेसी भागातील घनदाट जंगलात एका प्राचीन गुहेत मानवी हाताचा असा एक ठसा सापडला आहे, ज्याने इतिहास बदलण्यास भाग पाडले आहे. हे गुहाचित्र तब्बल ६७,८०० वर्षे जुने असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला असून, यामुळे जगातील सर्वात प्राचीन कलेचा मान आता युरोपऐवजी आशियाई देश इंडोनेशियाला मिळाला आहे.
कुठे लागला हा शोध?
'द टेलिग्राफ'ने दिलेल्या वृत्तानुसार, हा चमत्कारिक शोध इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटाजवळ असलेल्या मुना बेटावरील 'लियांग मेटांडुनो' या चुनखडीच्या गुहेत लागला आहे. या गुहेच्या भिंतीवर लाल रंगात हाताचा एक ठसा उमटवलेला आहे. आदिमानवाने आपला हात भिंतीवर ठेवून तोंडाने गेरूचा रंग फुंकून ही कलाकृती साकारली होती.
स्पेनचा रेकॉर्ड मोडला!
या शोधापूर्वी जगातील सर्वात जुनी कलाकृती स्पेनमध्ये असल्याचे मानले जात होते. स्पेनमधील हाताच्या ठशाचे वय ६६,७०० वर्षे इतके होते. मात्र, इंडोनेशियात सापडलेले हे चित्र त्यापेक्षाही १,१०० वर्षांनी जुने आहे. विशेष म्हणजे, या चित्रातील बोटे अशा प्रकारे दाखवण्यात आली आहेत की ती एखाद्या पंजासारखी टोकदार दिसतात, जे आदिमानवाच्या प्रगत विचारसरणीचे दर्शन घडवते.
युरोपचे वर्चस्व संपले
आतापर्यंत पाश्चात्य जगाचा असा दावा होता की, कलेची आणि सर्जनशील विचारांची सुरुवात केवळ युरोपमध्ये झाली आणि तिथून ती जगभर पसरली. मात्र, या शोधामुळे हे सिद्ध झाले आहे की, मानवी कल्पकता ही केवळ एका विशिष्ट भूभागापुरती मर्यादित नव्हती. जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांत मानवाने एकाच वेळी स्वतःला कलेच्या माध्यमातून व्यक्त करायला सुरुवात केली होती.
वयाचा अंदाज कसा लावला?
या पेंटिंगचे वय मोजण्यासाठी शास्त्रज्ञांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. गुहेच्या भिंतीवर पेंटिंगच्या वर कॅल्शियम कार्बोनेटचे जे थर साचले होते, त्यांचे विश्लेषण करण्यात आले. पेंटिंग या थरांच्या खाली असल्याने, ते थरांपेक्षाही जुने असल्याचे स्पष्ट झाले. शास्त्रज्ञ आता या भागात अधिक उत्खनन करण्याच्या तयारीत आहेत. त्यांना विश्वास आहे की, येथे अजूनही अनेक प्राचीन गुपिते दडलेली आहेत, जी मानवी उत्क्रांतीचा नवा इतिहास जगासमोर आणतील.