अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील कारवाईवरून जग चिंतेत असताना उत्तर कोरियाने जपानच्या दिशेने मिसाईल डागली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 10:09 IST2026-01-04T10:08:33+5:302026-01-04T10:09:01+5:30
North Korea Missile Test: उत्तर कोरियाने रविवारी पहाटे संशयास्पद बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागल्याने पूर्व आशियात तणाव वाढला आहे. जपान आणि दक्षिण कोरियाच्या लष्कराला हाय अलर्टवर राहण्याचे आदेश. वाचा सविस्तर.

अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील कारवाईवरून जग चिंतेत असताना उत्तर कोरियाने जपानच्या दिशेने मिसाईल डागली...
टोकियो/सोल: नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच जगभरात चिंतेचे वातावरण आहे. एकीकडे अमेरिकेने व्हेनेझुएलावर आक्रमण करत त्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांना ताब्यात घेतलेले असताना दुसरीकडे उत्तर कोरियाने खळबळ उडवून दिली आहे. रविवारी पहाटे उत्तर कोरियाने आपल्या पूर्व किनारपट्टीवरून जपानच्या समुद्रात संशयास्पद बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. या अनपेक्षित चाचणीमुळे जपान आणि दक्षिण कोरियामध्ये तात्काळ आणीबाणीचा इशारा देण्यात आला असून दोन्ही देशांचे लष्कर हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
जपानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाने डागलेली ही क्षेपणास्त्रे जपानच्या 'एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन'च्या (EEZ) बाहेर समुद्रात पडली. मात्र, या प्रक्षेपणामुळे जपान सरकारने काही काळासाठी नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले होते. जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइजुमी यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत म्हटले की, "उत्तर कोरियाच्या या कारवायांमुळे प्रादेशिक शांतता आणि जागतिक सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे."
दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांच्या चीन दौऱ्यापूर्वीच चाचणी
विशेष म्हणजे, दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे-म्युंग हे आज चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत होणाऱ्या या महत्त्वाच्या बैठकीत कोरियन द्विपकल्पातील शांततेवर चर्चा होणार होती. या दौऱ्याच्या अवघ्या काही तास आधीच किम जोंग उन यांच्या प्रशासनाने ही चाचणी करून दक्षिण कोरिया आणि मित्रराष्ट्रांना कडक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
ट्रम्प यांच्या व्हेनेझुएलातील कारवाईशी संबंध?
काही आंतरराष्ट्रीय विश्लेषकांच्या मते, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी व्हेनेझुएलामध्ये केलेल्या लष्करी कारवाईनंतर उत्तर कोरियाने हे पाऊल उचलले आहे. कोणत्याही परकीय आक्रमणाला तोंड देण्यासाठी उत्तर कोरिया सज्ज आहे, हे दाखवण्यासाठी किम जोंग उन यांनी ही 'शक्तीप्रदर्शनाची' वेळ निवडल्याचे बोलले जात आहे.