ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 06:32 IST2025-10-07T06:31:48+5:302025-10-07T06:32:01+5:30
शरीराच्या प्रतिकारशक्तीची दिशा योग्य ठेवणाऱ्या ‘पेरिफेरल इम्युन टॉलरन्स’ या यंत्रणेशी संबंधित त्यांच्या संशोधनाला हा सर्वोच्च सन्मान मिळाला आहे. स्टॉकहोम येथील कारोलिन्स्का इन्स्टिट्यूटच्या समितीकडून ही घोषणा करण्यात आली.

ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
स्टॉकहोम : यंदाचा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या मेरी ई. ब्रुनको, फ्रेड रॅम्सडेल आणि जपानच्या शिमॉन साकागुची या तीन शास्त्रज्ञांना जाहीर करण्यात आला आहे. शरीराच्या प्रतिकारशक्तीची दिशा योग्य ठेवणाऱ्या ‘पेरिफेरल इम्युन टॉलरन्स’ या यंत्रणेशी संबंधित त्यांच्या संशोधनाला हा सर्वोच्च सन्मान मिळाला आहे. स्टॉकहोम येथील कारोलिन्स्का इन्स्टिट्यूटच्या समितीकडून ही घोषणा करण्यात आली.
कोणत्या संशोधनासाठी पुरस्कार
शरीरातील प्रतिकारक शक्ती आपल्याच ऊतींवर किंवा अवयवांवर चुकून हल्ला करू नये, यासाठी कशा प्रकारे नियंत्रण ठेवले जाते, याचा शोध या शास्त्रज्ञांनी घेतला. त्यांनी प्रतिकारशक्तीतील ‘रेग्युलेटरी टी-सेल्स’ या पेशींची भूमिका स्पष्ट केली. या पेशी इतर इम्यून सेल्सवर लक्ष ठेवतात व शरीराच्या स्वतःच्या ऊतींचे संरक्षण करतात.
‘पेरिफेरल इम्युन टॉलरन्स’ म्हणजे काय?
ही अशी यंत्रणा आहे, जी शरीरातील प्रतिकारशक्तीला स्वतःच्या ऊतींवर हल्ला करण्यापासून थांबवते. ती फक्त बाह्य आक्रमण कर्त्यांविरुद्ध लढेल, याची खात्री देते.
‘’संशोधनामुळे वैद्यकीय शास्त्राला नवी दिशा मिळाली असून, कॅन्सर उपचार व अवयव प्रत्यारोपण अधिक प्रभावी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे,’’ असे नोबेल समितीने म्हटले.